– जानेफळ स्टेट बँकेत जायचे म्हटले की, अंगावर काटा येतो; शेतकरी, कर्जदार, खातेदार यांनी वाचला बँकेच्या तक्रारीचा पाढा!
– स्टेट बँकेत वेळेवर काम होत नसल्याने खाजगी बँकांचे दार ठोठावले; बचत गटाच्या महिलांनी कथन केली आपबिती!
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – इतर बँकांच्या तुलनेत भारतीय स्टेट बँकेची सेवा चांगली निश्चितच आहे, शिवाय व्याजदर कमी असून लोकांची स्टेट बँकेकडे पाहण्याची दृष्टीसुध्दा सकारात्मक आहे, तरी शेतकरी, महिला बचत गटसह इतरांनी भारतीय स्टेट बँकेच्या विविध कर्ज योजनांचा लाभ घेऊन आपली उन्नती करून घ्यावी, असे आवाहन बुलढाणा येथील भारतीय स्टेट बँक क्षेत्रीय कार्यालयाचे संदीप जाधव यांनी केले. यावेळी भारतीय स्टेट बँक जानेफळ शाखेबाबत, शेतकरी कर्जदार यांनी तक्रारीचा पाढा वाचला. बँकेत होणारी गर्दी व मिळणारी सेवा त्यामुळे जानेफळ स्टेट बँकेत जायचे म्हटले की, अंगावर काटा येतो अशादेखील संतप्त भावना काहींनी व्यक्त केल्या. तर जानेफळ येथील स्टेट बँकेत चकरा मारूनही वेळेवर काम होत नाही म्हणून नाईलाजाने आम्हाला खाजगी बँकेचे दार ठोठावे लागते, अशी आपबितीदेखील महिला बचत गटाच्या बहुसंख्य महिलांनी यावेळी कथन केली. अन्नदाता महोत्सवांतर्गत मेहकर तालुक्यातील भारतीय स्टेट बँक शाखा जानेफळच्यावतीने देऊळगाव साखरशा येथील गणपती मंदिरात दि. २० डिसेंबररोजी संध्याकाळी स्टेट बँकेच्या विविध कर्ज योजनांबाबत माहिती देण्यासाठी एका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संदीप जाधव प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी सरपंच संदीप अल्हाट, पोलिस पाटील गजानन पाचपोर, ब्रेकिंग महाराष्ट्रचे संपादक बाळू वानखडे, ग्रामपंचायत सदस्य रणजीत देशमुख, शे. अबरार, स्टेट बँकेचे क्षेत्रीय अधिकारी गोपाल भगतसह वैभव निकम, प्रशांत वानखडेसह आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना संदीप जाधव म्हणाले की, भारतीय स्टेट बँकेच्यावतीने शेडनेट, फळबाग, वेअर हाऊस आदीसाठी वाढीव कर्ज पुरवठा केला जातो. तसेच कृषी समृद्ध कर्ज, ट्रॅक्टर, हार्वेस्टर कर्ज, दाल मिल, आईलमील, दूध डेअरीसह इतर बाबींसाठीदेखील कर्ज पुरवठा केला जातो. तरी त्याचा गरजूंनी लाभ घ्यावा. देऊळगाव साकरशा येथे ९० महिला बचत गट असून, बहुतांश गट खाजगी बँकेकडून कर्ज घेऊन जादा व्याजाचा भूर्दंड सहन करतात, तरी त्यांनी स्टेट बँकेच्या विविध कर्जाचा लाभ घ्यावा, असे सांगितले. यावेळी बचत गटाच्या महिलांनी आपल्या स्टेट बँकेच्या कर्जासाठी जानेफळ शाखेत चकरा माराव्या लागतात तरीही कर्ज मिळत नाही, त्यामुळे नाईलाजास्तव आम्हाला खाजगी बँकेकडे जावे लागते असे सांगितले. तसेच शेतकरी, कर्जदार, खातेदारांनीही बँकेतील होणार्या हेळसांडीबाबत यावेळी तीव्र नाराजी व्यक्त केली. केवायसीसाठीदेखील चार-चार दिवस चकरा माराव्या लागतात, असेही काहींनी सांगितले. देऊळगाव साखरशा येथून जानेफळ २२ किलोमीटर दूर असल्याने गैरसोयीचे आहे, तरी येथे बँकेची नवीन शाखा सुरू करावी, ही बरेच दिवसांची आमची मागणी पूर्ण करावी, अशी मागणीदेखील यावेळी करण्यात आली. भारतीय स्टेट बँक शाखा जानेफळ येथे जवळजवळ ४५ गावे जोडलेली असून, ५० हजाराच्या जवळपास खातेदार आहेत तर कर्मचारीही कामाच्या तुलनेत कमी पडतात, त्यामुळे आपली गैरसोय झाली असेल, परंतु यापुढे असे होणार नाही, अशीदेखील हमी क्षेत्रीय कार्यालयाचे संदीप जाधव यांनी दिली व पुढील दहा दिवस बँकेच्या दोन कर्मचार्यांनी देऊळगाव साखरशा येथे येऊन सेवा देण्याबाबतचे आदेश दिले. यावेळी जानेफळ शाखेचे क्षेत्रीय अधिकारी गोपाल भगत यांनी बँकेच्या सेटलमेंट योजनेसह विविध कर्जांबाबत माहिती दिली. यावेळी महादेव आमले, गणेश गायकवाड, प्रभू सुरडकर, विपुल देशमुख, तेजराज नहार, मोहन अल्हाटसह शेतकरी, कर्जदार, तसेच महिला बचत गटाच्या सीआरपी, बचत गटाच्या महिला व गावकरी बहुसंख्येने उपस्थित होते. यशस्वीतेसाठी साठी सीएससी केंद्राचे संचालक गोपाल बुंधे सह इतरांनी परिश्रम घेतले.