– ठाणेदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे दिले निवेदन
बुलढाणा/चिखली(संजय निकाळजे) – परभणी प्रकरणातील शहीद सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणी दोषींना बडतर्फ करून फाशीची शिक्षा देण्यात यावी, आंदोलकावरील गुन्हे खारीज करावे, सोमनाथ सूर्यवंशी यांचे कुटुंबाचे पुनर्वसन करावे. या व इतर अन्य मागण्यासाठी चिखलीत गुरुवार 19 डिसेंबर रोजी जेलभरो आंदोलन करण्यात आले. तत्पूर्वी शहीद सोमनाथ सूर्यवंशी व आंबेडकरी चळवळीचे नेते विजय वाकोडे यांना फुले-आंबेडकर वाटिकेत अभिवादन करण्यात आले.
परभणी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधान स्तंभाची माथेफिरूने तोडफोड केल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली. तसेच या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन सुरू असताना झालेल्या दगडफेकी प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या व एलएलबीचे शिक्षण घेत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाचा पोलिसांनी केलेल्या महाराणीत न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. तसेच आंबेडकरी चळवळीचे नेते विजय वाकोडे यांचे देखील हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यानिमित्त परभणीच्या या संविधान स्तंभ तोडफोड प्रकरणाच्या निषेधार्थ जलभरो आंदोलन निषेध व सोमनाथ सूर्यवंशी व विजय वाकोडे मृत्यूप्रकरणी सभा फुले- आंबेडकर वाटिका येथे घेण्यात आली. त्यानंतर येथून जेलभरो आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. यावेळी आंदोलनकर्ते चिखली पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तेथे चिखली ठाणेदार यांचेमार्फत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात नमूद आहे की, परभणी येथील हिंसाचार, हत्या, खोटे गुन्हे, संविधान शिल्प अवमान प्रकरणी दोषीवर राष्ट्रदोहाचा गुन्हा दाखल करावा, या प्रकरणातील अधिकारी व कर्मचारी खून व मारहाण प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, सोमनाथ सूर्यवंशी यांचे कुटुंबाचे शासनकृत पुनर्वसन करावे, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी राज्य शासनाचे प्रमुख या नात्याने परभणी प्रकरणात आंदोलकावरील गुन्हे खारीज करावे, सोमनाथ सूर्यवंशी यांचे हत्येस दोषी सर्व पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे. आदी मागण्यांचा समावेश असून गृहमंत्री अमित शहा यांनी आंबेडकरी समाजाची नव्हे तर संपूर्ण देशाची माफी मागावी या मागण्यांचा समावेश आहे. तसेच या मागण्यांची पूर्तता करून नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात घोषणा करावी. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांच्या वतीने देण्यात आला. अभिवादन सभेला तसेच जेलभरो आंदोलनात चिखली तालुक्यातील भीमसैनिक, बंधू-भगिनीं व फुले, शाहू, आंबेडकरी जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदवला.