– वरोडी येथील परमहंस तेजस्वी महाराज जन्मोत्सवाची सांगता
साखरखेर्डा (अशोक इंगळे) – हल्ली लोकं डेकोरेशन भक्ती करून निस्सीम भक्त असल्याचा आव आणत आहेत. मात्र ह्या मतलबी भक्तीच्या बळावर काही पदरात पडू शकत नाही त्यामुळे परमहंस तेजस्वी महाराजांचे विचार आचरणात आणा. कारण समाजापेक्षा संत, थोर पुरुष मोठे आहेत, असे मत सप्तखंजेरी वादक, थोर प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी समाजाला प्रबोधन करताना केले. ते तीर्थक्षेत्र वरोडी येथे परमहंस तेजस्वी महाराज जन्मोत्सव सोहळ्याच्या समारोपप्रसंगी आपल्या कीर्तनातून बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर परमहंस तेजस्वी महाराज संस्थानचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मणराव गारोळे, हभप. प्रकाश महाराज मगर, जनार्दन गुंजकर हे उपस्थित होते. आपल्या समाज प्रबोधन कीर्तनात सत्यपाल महाराज म्हणाले की, तरूणांनी व्यसनाच्या आहारी न जाता मायबापाच्या घामाचा विचार केला पाहिजे, असे सांगून त्यांनी थोर महापुरुषांचा आदर्श घेण्याचे आवाहन केले. आजकाल भक्तीचे अवडंबर माजले असून, पंचतारांकित बुवा आणि बाबा यांनी ईश्वरभक्तीचा बाजार मांडला आहे. अशा दिखाव्याने त्यांना आणि त्यांच्या भक्तांनाही देव भेटणार नाही. कष्टातून आणि प्रामाणिक श्रद्धेतूनच देवाची प्राप्ती होते, असेही याप्रसंगी सत्यपाल महाराज यांनी सांगून, समाजातील बुवाबाजी व व्यसनाधिनतेवर त्यांची आपल्या कीर्तनातून चांगलेच आसूड ओढले. संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या प्रभृतिंनी गावखेड्यातील मानवी समूहाच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक उन्नतीसाठी दिलेला मूलमंत्र सत्यपाल महाराज हे आपल्या कीर्तनातून देत आहेत. विदर्भातील जनमानसावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबा यांच्या कीर्तन जागराचा खूप मोठा प्रभाव आहे. गावागावात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रेरणेने गुरुदेव सेवा मंडळ या भजनातून प्रबोधन करणार्या मंडळांची स्थापना करण्यात आलेली आहे. गावातील गुरुदेव सेवा मंडळात गेल्यापासून सत्यपाल महाराज यांना कीर्तन आणि खंजेरीची ओळख झाली. सत्यपाल महाराज बालवयातच कीर्तनाच्या कार्यक्रमात भाग घेत असत. नळकांडे नावाच्या गुहस्थामुळे ते भजन करायला जायला लागले. यावेळी भजनात ते खंजेरी वाजवीत असत. कालांतराने शाळा, विविध सांस्कृतिक कार्यक्रम अशा व्यासपीठावरून ते कीर्तन सादर करू लागले. येथूनच कुटुंबातील प्रेरणेने त्यांचा कीर्तनाचा प्रवास सुरु झाला. संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी गाव हेच तीर्थ असून, आपण आपल्या गावाचा विकास साधला पाहिजे, हा विचार आपल्या कीर्तनातून मांडून बराच काळ व्यतीत झाला होता. याच काळात अठराविश्व दारिद्र्य अनुभवून आणि गावातील अठरापगड जातीजमाती आणि त्यांची वंचना बघून सत्यपाल महाराज यांनी आपल्या प्रबोधनपर्वाची सुरुवात केली. ग्रामप्रबोधनाचा एक विचार घेवून सत्यपाल महाराज आपले कीर्तन सादर करतात. अगदी खेडवळ परंतु थेट प्रभावी वर्हाडी बोलीभाषेत ते कीर्तन सादर करतात. जातीभेद, अंधश्रद्धा, स्त्रीभ्रूणहत्या, व्यसनमुक्ती, घनकचरा व्यवस्थापन, निर्मल ग्राम, शिक्षण या अशा अनेक ग्रामीण माणसाला भिडणार्या समस्यावर ते भाष्य करतात. त्यांची शैली ही लोकशैली असून त्याला नर्मविनोदाची,उपरोध उपहासाची जोड असते.
संत गाडगेबाबा यांची कीर्तनशैली ही श्रोतुसंवादाची शैली होती. कीर्तन ऐकायला आलेल्या श्रोत्याला थेट प्रश्न विचारणे, उत्तराबद्दल त्याला शाबासकी देणे किंवा प्रसंगी त्याला अंतर्मुख करणे अशाच श्रोतुसंवादी शैलीतून सत्यपाल महाराज कीर्तन सादर करतात. शेतमजूर, शेतकरी, गावातील अठरापगड जातीजमातीतील लोक, अल्पशिक्षित लोक, ग्रामीण स्त्रिया या सर्व घटकांचे अनुभवविश्व फार त्रोटक असण्याची शक्यता असते. प्रबोधनाची तत्त्वजड भाषा त्यांना कळेलच असे होत नाही. नेमकी ही बाब लक्षात घेवून सत्यपाल महाराज अगदी ग्रामीण अनुभवविश्वाला भिडेल अशी भाषा आणि निवेदन शैली त्यांच्या कीर्तनात वापरतात. घराघरात स्वच्छतागृहे असली पाहिजे म्हणजे निर्मल ग्राम निर्माण करता येईल या अशा साध्या पण तरीही तेवढ्याच अनेक महत्वाच्या विषयाची मांडणी ते त्यांच्या कीर्तनातून करतात. गावात अनेक जातीजमाती राहत असतात. अल्पशिक्षितता, जातीपातीतील शोषण, वंचनेमुळे या सर्व घटकांचा आत्मविश्वास कमी झालेला असतो.
————-