- पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रातील महत्वपूर्ण नेतेही हजर राहणार!
- उद्धव ठाकरेंसह १९ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण
मुंबई (खास प्रतिनिधी) – राज्याचे नवे मंत्रिमंडळ देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली अस्तित्वात येणार असून, उद्या (दि.४) भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी फडणवीस यांचीच वर्णी लागेल, अशी माहिती भाजपच्या खास सूत्राने दिली आहे. परवा, दि. ५ डिसेंबररोजी राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हेच शपथ घेतील, त्यांच्या शपथविधी सोहळ्याला देशातील १९ मुख्यमंत्र्यांना आमंत्रण देण्यात आलेले आहे. त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनादेखील या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आलेले आहे. मुख्यमंत्र्यांचा शपथविधी ५ डिसेंबरला आझाद मैदानात होणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी झालेली आहे.
राज्याचे नवीन मंत्रिमंडळ लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन होणार आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व शिवसेना शिंदे गटातील ज्येष्ठ नेत्यांना पहिल्या यादीत कॅबिनेट मंत्रिपद मिळणार आहे. पहिल्या यादीत वादग्रस्त मंत्र्यांना टाळण्यात आलेले आहे. शिवसेना शिंदे गटातून एकनाथ शिंदे, शंभूराजे देसाई, दादा भुसे, गुलाबराव पाटील, संजय राठोड, अर्जुन खोतकर, उदय सामंत हे ज्येष्ठ नेते कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतील, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील अजित पवार, नरहरी झिरवाळ, धनंजय मुंडे, सुनील शेळके, छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते पहिल्या यादीत कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतील, असेही या खात्रीशीर सूत्राने सांगितले आहे. तर भाजपकडून, रविंद्र चव्हाण, नीतेश राणे, गणेश नाईक, मंगलप्रभात लोढा, आशीष शेलार, राहुल नार्वेकर (मंगलप्रभात लोढा यांना दिलं तर राहुल नार्वेकर नसतील.), अतुल भातखळकर, शिवेंद्रसिंहराजे भोसले, गोपीचंद पडळकर, माधुरी मिसाळ, राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, संजय कुटे, गिरीश महाजन, जयकुमार रावल, पंकजा मुंडे, अतुल सावे व राणा जगजितसिंह पाटील यांची वर्णी लागणार आहे. महायुतीतील पक्षांना त्यांच्या संख्याबळानुसार मंत्रिपद दिले जाणार आहेत, यामुळे निश्चितच भारतीय जनता पक्षाकडे संख्याबळानुसार अधिक मंत्रिपदे राहणार आहेत.
शपथविधी सोहळ्यासाठी कोण कोण येणार?
– उद्धव ठाकरे, शरद पवारांसह सर्व बड्या नेत्यांना प्रशासकिय निमंत्रण
– सर्व माजी मुख्यमंत्री यांना निमंत्रण जाणार
– केंद्रातील भाजपचे प्रमुख पदाधिकारी
– मराठी कलाकार
– मुंबई, महाराष्ट्रातील प्रमुख पदांवरील व्यक्ती
– अंबानींसह सर्व बडे उद्योगपती
– सीए, डॉक्टर आणि सर्व क्षेत्रातील प्रतिष्ठीत
– 100 हून अधिक संत-महंत
– बॉलीवूड, मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकार
– 10 हजार लाडक्या बहिणी
– अजय-अतुल, कैलास खेर यांचे सांस्कृतिक कार्यक्रम
– ‘जो राम को लाये है हम उनको लायेंगे’ या गाण्याचे गायक कन्हैय्या मित्तल
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उदय सामंत आणि भाजप नेते गिरीश महाजन यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली आहे. तिघांमध्ये वर्षा बंगल्यातील मुख्यमंत्र्यांच्या अॅटी चेंबरमध्ये अर्धा तास चर्चा झाली. संभाव्य खाते वाटपावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कालही गिरीश महाजन हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला ठाण्याच्या शुभदीप बंगल्यावर गेले होते. आजही त्यांची दुसरी गोपनीय भेट आहे. महाजन हे फडणवीस यांचे खासमखास माणूस आहेत.