साखरखेर्डा/सिंदखेडराजा (अशोक इंगळे) – साखरखेर्डा परिसरासह संपूर्ण सिंदखेडराजा तालुक्यात रब्बी हंगामातील पिकाची पेरणी पूर्ण झाली आहे. तर काही शेतकरी ‘उपट पर्हाटी पेर गहू’ असेही करीत आहे. परंतु, अचानक हवामान बदलामुळे रब्बी पिकांवर संकट ओढावले असून, सर्वाधिक धोका तूर, हरभरा या पिकाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी निसर्गाच्या कचाट्यात सापडला आहे.

सिंदखेडराजा तालुक्यात पेरणीयोग्य क्षेत्रफळ ६५ हजार हेक्टर असून, खरीप हंगामात सोयाबीन, कपाशी, मका, ज्वारी संकरीत, मूग, उडीद, तूर ही पारंपरिक पिके घेतली जातात. खरीप हंगामातील पिकाची काढणी संपली असून, शेतकरी रब्बी पिकाकडे वळले आहेत. जवळजवळ ८० टक्के रब्बी पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. साखरखेर्डा मंडळात ६,५३९ हेक्टरपैकी ३ हजार हेक्टरवर हरबरा, आणि १,५०० हेक्टरवर गहू पेरणी करण्यात आली आहे. शेंदुर्जन, मलकापूर पांग्रा, दुसरबीड, सिंदखेडराजा, किनगावराजा, सोनुशी, मेरा बु., लव्हाळा मंडळातही हरबरा आणि गहू पेरणी करण्यात आली आहे. सोयाबीनला पाहिजे तसा भाव न मिळाल्याने आजही शेतकर्यांनी घरात सोयाबीन साठवून ठेवले आहे. सोयाबीन उत्पादक एकरी तीन ते चार क्विंटल उत्पादन झाले असल्याने शेतात केलेला खर्चही निघत नाही. आजही शेतकर्यांना भाववाढीची प्रतीक्षा आहे. खरीप हंगाम तोट्यात गेल्यानंतरही शेतकर्यांनी अपेक्षा सोडली नाही. शेतकरी हा परिस्थितीचा सामना करणार्यापैकी एक आहे. तो कधीही आर्थिक डबघाईस डगमगला नाही. त्याच जोशात रब्बी हंगामात आपले शेत तयार करुन हरबरा, गहू पेरणी करुन मोकळा झाला आहे.
हिवाळ्यात विजेची समस्या, जंगली प्राण्यांचा त्रास हा पाचविला पुंजलेला आहे. याबाबीकडे शासन कधीच लक्ष देत नाही. १ डिसेंबरपासून संपूर्ण तालुक्यावर ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. नोव्हेंबर महिन्यात प्रचंड थंडीची लाट निर्माण झाली होती. शेतकर्यांना रब्बी हंगामातील पिकाची वाढ चांगली होईल ही अपेक्षा होती. वाढ चांगली झाली. परंतु, अचानक हवामान बदलामुळे रब्बी पिकांवर संकट ओढावले असून, यात फुलात आलेली तूर फुल गळतीमुळे नुकसान होत आहे. त्यात हरबरा आणि तूर या पिकावर व्हायरस येण्याची शक्यता आहे.
अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. फवारणी यंत्र सज्ज ठेवून शेतकरी फवारणी करीत आहे. अवकाळी पाऊस झाला आणि प्रचंड प्रमाणात धुकं पडलं तर हरबरा पिकाची मागीलवर्षी जशी वाट लागली तशी वाट लागण्याची शक्यता आहे. त्यासाठी शेतकर्यांनी लागलीच ई- पीक पाहणी सर्व्हे करून अहवाल महसूल विभागाला पाठवावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे यांनी केले आहे.
—-