द्रौपदी मुर्मू देशाच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती
– देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेणार
– तिसर्याच फेरीत ५.७७ लाख मते घेऊन विजयी
– विरोधी पक्षांचे यशवंत सिन्हा यांना मिळाली २.६१ लाख मते
– पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मुर्मू यांच्या घरी जाऊन अभिनंदन
नवी दिल्ली (विशेष राजकीय प्रतिनिधी) – राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)च्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या देशाच्या १५ व्या राष्ट्रपती व पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती बनल्या आहेत. त्यांच्या निमित्ताने या देशाच्या मूळनिवासी समाजाला पहिल्यांदाच देशाचे संवैधानिक सर्वोच्च पद लाभले आहे.
आज सकाळी ११ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. मुर्मू यांनी संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए)चे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा तिसर्या फेरीतच पराभव केला. मुर्मू यांना ५ लाख ४३ हजार २६१ इतकी मते विजयासाठी आवश्यक होती, तर त्यांना याच फेरीत ५ लाख ७७ हजार ७७७ इतकी मते मिळाली. विरोधी यशवंत सिन्हा यांना २ लाख ६१ हजार ६२ इतकी मते पडली. या वियानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी द्रौपदी मुर्मू यांच्या घरी जाऊन त्यांचे अभिनंदन केले. लोकसभा, राज्यसभा आणि २० राज्यांच्या विधानसभा सदस्यांनी राष्ट्रपती निवडणुकीत मतदान केले होते.
यूपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांनी आपला पराभव स्वीकारला असून, त्यांनी नवनियुक्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे अभिनंदन करत, त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. देशाच्या लोकशाही संवर्धनासाठी त्या कोणत्याही भय व पक्षपाताविना देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून आपले सर्वोच्च योगदान देतील, अशी अपेक्षा सिन्हा यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात व्यक्त केली आहे. गाव, गरीब, झोपडी आणि वंचित समाजातून आलेली एक मूळनिवासी महिला देशाच्या सर्वोच्च पदावर पोहोचली आहे, ही आमच्या लोकशाहीची ताकद आहे, असेही ते म्हणाले.
विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलैच्या मध्यरात्री संपणार आहे. त्यामुळे २५ जुलैरोजी नवीन राष्ट्रपतींचा शपथविधी होईल. मुर्मू यांच्या विजयाने भाजपने देशभर जल्लोष साजरा करण्याचे नियोजन केलेले आहे.
——