बुलडाणा (जिल्हा प्रतिनिधी) : राजे लखुजीराव जाधव यांचे वंशज असलेल्या राजे जाधव परिवार तसेच राजे लखुजीराव जाधव शिक्षण संस्था सिंदखेड राजा व मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने राजे लखुजीराव जाधव स्मृती दिनानिमित्त राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण केले जाते. शिवाजी राजेजाधव यांच्या पुढाकाराने दरवर्षी राजे लखुजीराव जाधव स्मृतीनदिन व जाधव कुळ मेळाव्याचे आयोजन केले जाते. यानिमित्ताने समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान केला जातो. यावर्षी दै. ‘पुण्य नगरी’चे आवृत्ती प्रमुख अनिल म्हस्के यांना या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब यांचे वडिल व राजेजाधव घराण्याचे मुळपुरुष तथा प्रेरणास्थान राजे लखुजीराव जाधव यांच्या सिंदखेड राजा येथील समाधीस्थळी त्यांच्या ३९३ व्या स्मृतीदिनानिमित्त मावळ्यांच्या जाज्वल्य, प्रेरक इतिहासाचे पुन:स्मरण करण्यासाठी २५ जुलै रोजी राजे लखुजीराव जाधव स्मृतीदिन व जाधव कुळ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजता राजवाडा ते समाधीस्थळ अशी शोभायात्रा काढली जाणार आहे. त्यानंतर १० वाजता समाधीपूजन होईल. त्यानंतर सकाळी ११.३० वा. सावता भवन न. प. सिंदखेड राजा येथे राजे लखुजीराव जाधव स्मृती पुरस्कार वितरण व सत्कार समारंभ होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री तथा आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे राहणार आहेत. भुइंज सातारा येथील भैय्यासाहेब जाधवराव यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. दै. ‘पुण्य नगरी’चे अकोला, वाशीम, बुलडाणा आवृत्तीप्रमुख अनिल म्हस्के यांना राजे लखुजीराव जाधव स्मृती पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहेत. तसेच यावेळी प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख, लिज्जत पापड उद्योग समुहाचे एमडी सुरेशराव कोते, प्रसिद्ध शिवशाहीर यशवंतराव गोसावी, उद्योजक विजयसिंग राजेजाधव यांचा देखील सत्कार केला जाणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन या सोहळ्याचे आयोजक राजे लखुजीराव जाधव यांचे वंशज शिवाजी राजेजाधव यांनी केले आहे.