नंदुरबार (जिल्हा प्रतिनिधी) – जिल्ह्यात पावसाने उसंत घेतली असली तरी सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये तसेच शेजारील मध्यप्रदेश मध्ये पाऊस सुरूच आहे. त्यामुळे तापी आणि तिच्या उपनदींच्या पाणी पातळीत वाढ झाल्याचे दिसून आल्याने सारंगखेडा आणि प्रकाशा बॅरेज मधील पाण्याची पातळी नियंत्रित करण्यासाठी तापी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
प्रकाशा बॅरेजचे पंधरापैकी सात दरवाजे उघडण्यात आले आहेत. तापी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग होत असल्याने तापी नदी दुथडी भरून वाहत आहे. पाण्याच्या विसर्ग सुरू असल्याने मासेमारीसाठी मोठ्या प्रमाणात नागरिक तापी नदी काठावर येत असल्याने प्रशासनाच्या वतीने नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.