आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : वारकरी संप्रदाय हा समाजाला संस्काराची दिशा देणारा असून वारकरी शिक्षण संस्थातील मुलांचा शिक्षणाचा सर्व खर्च शासनाने करावा, अशी मागणी हभप. विठ्ठल पाटील यांनी आळंदी येथील संत तुकाराम बीजोत्सव व भव्य दिंडी सोहळाप्रसंगी केले. सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन व वारकरी साहित्य परिषद , महाराष्ट्र , यांच्या संयुक्त विद्यमाने आळंदी येथील मावळ तालुका धर्मशाळेमध्ये संत तुकाराम महाराज बीजोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. आळंदीत दिंडी प्रदक्षिणेच्या येथील ४० वर वारकरी शिक्षण संस्थातील दीड हजारावर मुलांनी ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरा पासून ज्ञानोबा तुकाराम च्या जयघोषात दिंडी काढून प्रदक्षिणा घालत दिंडीचे हरिनाम गजरात कार्यक्रम स्थळी आगमन झाले.
साहित्य परिषदेचे सचिव लक्ष्मण शेठ शेरकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, व्यवस्थापक माउली वीर, संजय महाराज घुंडरे, साहित्य परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष विठ्ठल पाटील , विश्वस्त चैतन्य महाराज कबीर बुवा ,सहसचिव नरहरी बुवा चौधरी ,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष भाऊसाहेब महाराज हांडे, जिल्हाध्यक्ष प्रशांत महाराज मोरे , उपाध्यक्ष पुंडलिक महाराज चौरे, महिला जिल्हाध्यक्ष हभप सविताताई गवते , पुणे शहराध्यक्ष आनंद महाराज कदम , सहसचिव ह भ प शामराव गायकवाड , सदस्य हभप राजेंद्र गरुड, हभप पोपट महाराज मिडगुले, ज्ञानेश्वर मिड गुले , हभप गणेश मालुजकर, जिल्ह्यातील साहित्य परीषदेचे सदस्य , सावता महाराज शिक्षण संस्थेतील ज्ञानेश्वर महाराज गवळी व ४० वारकरी शिक्षण संस्थेचे चालक, व्यवस्थापक, अध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
दीप प्रज्वलन व ज्ञानोबा तुकोबांचे प्रतिमेस पुष्पहार घालून हभप महादेव महाराजांचे अभंगाने स्वागत झाले. प्रास्ताविकात हभप प्रशांत महाराज मोरे यांनी संत साहित्याचा वसा व वारसा पुढील पिढीकडे जाण्यासाठी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये वाईट प्रवृतींना व विकृत विनोदांना थारा नको . नारदाच्या गादीचे पावित्र्य राखूनच किर्तनसेवा सादर व्हाव्यात . हभप नरहरी चौधरी यांनी नवपिढीला सामावून घेण्याचे आवाहन केले . चैतन्य महाराज कबीर बुवा यांनी वारकरी शिक्षण संस्था चालकांच्या अडचणी प्रसंगी मदत करण्याचे सुतोवाच केले . हभप विठ्ठल पाटील यांनी ३६ जिल्ह्यात वारकरी साहित्य परीषदेचे काम चालू असून शाळा कॉलेजांनी संत साहित्याचा प्रसार करण्याचे धोरण सांगितले . संताचे साहित्य म्हणजे फक्त अभंग नसून त्यामध्ये ओव्या , श्लोक , दोहे , गौळण , भारूडादी डझनावर आशयघन प्रकार असून यांचा भावार्थ प्रबोधनात्मक असून चालीही आर्केस्ट्राच्या गाण्यां पेक्षा चांगल्या आहेत पण त्या तरुणाईच्या कानी पोचत नाहीत , ज्या शेकडो वर्षानंतरही चिरतरुण वाटतात . छोट्या हरीपाठ पासून सुरुवात करून मुलांना अध्यात्म परमार्थाची गोडी लावल्यासच पुढील पिढी सुसंस्कारीत घडेल , असेही सांगितले . यावेळी संतकृपा या अंकाचे प्रकाशनही अध्यक्ष विठ्ठल पाटील व मान्यवरांचे हस्ते करण्यात आले . आळंदी ग्रामस्थ व वारकरी साहीत्य परीषदेच्या वतीने काकां जींचा वाढदिवस असलेने पुणेरी पगडी, तुकाराम महाराजांची मुर्ती व पुष्पगुच्छ हार घालून सत्कार करणेत आला . सचिव लक्ष्मण शेरकर यांनी सुत्रसंचलन केले . पसायदान व महाप्रासादाने संत तुकाराम बिजोत्सवाची सांगता झाली.