बुलढाणा (विशेष प्रतिनिधी) – मागील महिन्यात २४ फेब्रुवारी रोजी सकाळी माजी आमदार राहुल बोंद्रे यांचे वडील तात्यासाहेब बोंद्रे यांचे निधन झाले. त्या अनुषंगाने लोककला सांस्कृतिक मंचाचे संस्थापक अध्यक्ष गीतकार-संगीतकार विष्णु शिंदे यांनी बोंद्रे कुटुंबाची त्यांच्या निवासस्थानी रविवार, १२ मार्च रोजी कलावंतांसह सांत्वनपर भेट घेतली व तात्यासाहेबांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी विष्णु शिंदे यांनी तात्यासाहेबांचे कार्य महान असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व सहकार क्षेत्रामध्ये त्यांचे मोलाचे योगदान राहिलेले आहे. त्यांच्या स्मृती सदैव अजरामर राहतील. असे सांगून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
शनिवार ११ मार्च रोजी लोककला सांस्कृतिक मंचाच्यावतीने बुलढाणा येथील गर्दे सभागृहात मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यानिमित्त विष्णु शिंदे हे बुलढाणा जिल्हा दौर्यावर होते. आज रविवारी त्यांनी माजी आमदार राहुल बोंद्रे यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी राहुल बोंद्रे व एड.विजयकुमार कस्तुरे यांनी तात्यासाहेबांच्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा देऊन माहिती दिली. याप्रसंगी राहुल बोंद्रे यांनी आपल्या पित्याच्या सहवासातील अनेक आठवणी यावेळी विशद केल्या. तात्यासाहेब बुद्धगया, सारनाथ या ठिकाणी जाऊन आले होते. त्यांच्यासोबत असताना सतत ते बुद्धाविषयी व बुद्ध धर्माविषयी सांगत असत. बौद्ध धर्माविषयी त्यांचा अभ्यास होता एक वेळ त्यांनी अनुराधा कॉलेज परिसरात भंतेजींना आणून प्रवचन कार्यक्रमाचेदेखील आयोजन केले होते. दलाई लामा यांनादेखील चिखलीत आणण्याचा तात्यासाहेबांचा विचार होता, मात्र त्यांचे वय आणि प्रवास बघता ते शक्य झाले नाही. मात्र लवकरच अभ्यासू भंतेजींना बोलावून तात्यासाहेबांची इच्छा आपण पूर्ण करणार असल्याची ग्वाही यावेळी राहुलभाऊंनी दिली. समाजाची त्यांनी निस्वार्थपणे सेवा केली. अंध, अपंग, निराधारांना मदतीचा हात देखील दिला. हे सांगताना अक्षरशा राहुलभाऊ भावनिक होऊन सांगत होते. यावेळी उपस्थितांमध्ये स्तब्धता पसरली.
एड कस्तुरे यांनी तात्यासाहेबांना मी कधीच जोरात बोलताना किंवा कोणावर चिडताना बघितले नसल्याचे सांगितले. यावेळी बोलताना विष्णु शिंदे यांनी तात्यासाहेब बोंद्रे गेल्यामुळे समाजाची फार मोठी हानी झाली असून ती कधी न भरून निघण्यासारखी आहे. महाराष्ट्रातील कलावंतांच्यावतीने मी त्यांना आदरांजली अर्पण करत असल्याचे सांगितले. याप्रसंगी लोककला सांस्कृतिक मंचाचे उपाध्यक्ष शाहीर डी.आर.इंगळे, जिल्हाध्यक्ष शिवाजी लहाने, एड. विजयकुमार कस्तुरे, कवी गायक एस के जाधव सर, शाहीर कचरू ठोंबरे, गजाननदादा गवई, दिगंबर पवार, कवीगायक प्रीतमकुमार मिसाळ, गायक विजय मलवार, पत्रकार तथा गायक संजय निकाळजे, गायक सुरेश अवसरमोल, ढोलक वादक संदीप साळवे, गजानन जाधव यांच्यासह कलावंत उपस्थित होते.