वर्धा (विशेष प्रतिनिधी) – विधान परिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाकरीता झालेल्या मतदानाची मतमोजणी पार पडली. यात महाविकास आघाडीचे सुधाकर अडबाले यांनी भाजप समर्थित उमेदवारापेक्षा दुप्पटीपेक्षा जास्त मते घेऊन विजय मिळविला. यात विद्यमान आमदार तसेच भाजप समर्थित उमेदवार नागो गाणार यांचा पराभव केला.
सुधाकर अडबाले यांना १६ हजार ७०० मते मिळाली. तर नागो गाणार यांना ८ हजार २११ मते मिळाली. मतमोजणीच्या पहिल्या पसंतीतच महाविकास आघाडीचे सुधाकर अडबाले यांनी मतांचा कोटा पूर्ण केला. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नवनिर्वाचित आमदार सुधाकर अडबाले यांना पेढे भरविले. मतमोजणी पूर्ण होताच सुधाकर अडबाले यांच्या समर्थकांनी जल्लोष करायला सुरुवात केली. नागपूर मतदारसंघातून २२ उमेदवारांनी निवडणूक लढविली होती. सुधाकर अडबाले यांना दोन वर्षांपूर्वीच विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने उमेदवारी दिली होती.त्यांना महाविकास आघाडीने समर्थन दिले. त्यानंतर त्यांनी संपर्क सुरू केला होता. त्यातच जुनी पेन्शन योजनेच्या मागणीकरीता शिक्षकांत एकजूट होती.त्याचा फटका भाजपचे समर्थन असलेल्या नागो गाणार यांना बसला. शिक्षकांनी `नो पेन्शन,नो व्होट`चा नारा दिला होता.या मतसंघर्षात शिक्षक भारतीचे राजेंद्र झाडे,राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार सुधाकर इटकेलवार मागे पडले.काहीच्या भ्रमाचा भोपळा फुटला.
जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीची लढाई आम्ही यापूर्वी रस्त्यावर लढत होतो. तिच लढाई आम्ही सदनात लढणार,असे महाविकास आघाडीचे सुधाकर अडबाले यांनी जाहीर केले. त्यांनी य़ा विजयी वाटचालीबाबत महाविकास आघाडीचे सर्व नेते तसेच विमाशिचे ज्येष्ठ नेते माजी आमदार विश्वनाथ डायगव्हाणे, सर्व शिक्षकांचे आभार मानले आहे.हा विजय महाविकास आघाडी,विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ तसेच सर्व शिक्षकांचा आणि पाठिंबा देणार्या सर्व ३४ संघटनांचा असल्याचेही स्पष्ट केले. हा शिक्षकांच्या एकजुटीचा विजय असल्याचेही सांगितले. महाविकास आघाडीत कोठलीही फूट नव्हती,ही बाबही त्यांनी स्पष्ट केली.