बुलढाणा (एकनाथ माळेकर) – अमरावती पदवीधर मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे ओबीसी समाजातील नेते प्रा. डॉ. अनिल अमलकार व महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे यांच्यात चुरशीच्या लढतीचे चित्र निर्माण झाले असतानाच, आता लिंगाडे यांना जोरदार धक्का बसला आहे. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमरावती विद्यापीठ राष्ट्रवादी शिक्षक संघाने लिंगाडेंऐवजी प्रा. डॉ. अमलकार यांना आपला पाठिंबा दर्शविला आहे. हा शिक्षक संघ प्रभावशाली संघटना असून, त्यामुळे अमलकार यांना हत्तीचे बळ प्राप्त झाले आहे. यापूर्वी कास्ट्राईब या सर्वात मोठ्या कर्मचारी संघटनेनेदेखील त्यांना पाठिंबा दिलेला आहे.
अमरावती विद्यापीठ राष्ट्रवादी शिक्षक संघाने प्रा. डॉ. अमलकार यांना पत्र देऊन हा पाठिंबा दिला आहे. महाविकास आघाडीकडून धीरज लिंगाडे हे निवडणुकीत उमेदवार असतानाही राष्ट्रवादीच्या शिक्षक संघाचा वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा मिळाल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत, यामुळे महाविकास आघाडीमधील अंतर्गत वादही चव्हाट्यावर आला, तर राष्ट्रवादी नेमका कुणाचा राजकीय गेम करणार? हा प्रश्न निर्माण झाल्याने धीरज लिंगाडे यांच्यासाठी धोक्याची पहिली घंटा वाजली आहे.
अमरावती पदवीधर मतदारसंघात एकूण २३ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये प्रमुख लढत ही वंचित बहुजन आघाडीचे प्रा. डॉ. अनिल अमलकार व महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे यांच्यात होत आहे. त्यामुळे या मतदारसंघात या दोघांत चुरशीची लढत होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यापीठ शिक्षक संघाने वंचित आघाडीला पाठिंबा दिल्याने पदवीधर मतदारांमध्ये राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने सूचक इशारा तर दिला नाही ना, असा सवाल निर्माण झालेला आहे. उच्चविद्याविभूषीत व ओबीसी समाजातील असलेल्या अमलकार यांनी या निवडणुकीत काटेकोरपणे प्रचार मोहीम चालवली असून, त्यांना अनेक संघटनांचा पाठिंबा मिळालेला आहे. शिवाय, ओबीसी बहुजन समाजातील पदवीधर मतदार हे त्यांच्या बाजूने उभे राहिले आहेत. परिणामी, धीरज लिंगाडे व अमलकार यांच्यात खरी लढत होणार असल्याचे संकेत प्राप्त होत आहेत.
डॉ. राजेंद्र शिंगणेंकडून मतदारांची दिशाभूल : अमलकार यांचा आरोप; पोलिसांत तक्रार दाखल
दरम्यान, अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांच्या प्रचारार्थ स्थानिक गर्दे वाचनालय सभागृहात सोमवारी (दि. २४) संध्याकाळी उशिरा आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते आ. राजेंद्र शिंगणे यांनी मोजक्या माध्यम प्रतिनिधींशी चर्चा केली. ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती झाल्यानंतर अमरावती पदवीधर मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अनिल अमलकार यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांना पाठिंबा देण्यासंदर्भात आमची बोलणी सुरू आहे, असे ते म्हणाले. लवकरच त्याला यश मिळणार असल्याचे वक्तव्यही शिंगणे यांनी केले होते. हे वृत्त सार्वत्रिक झाल्यावर अनिल अमलकार यांनी खामगाव येथे माध्यमांशी बोलताना त्यास स्पष्ट नकार दिला. एवढेच नाही तर, त्यांनी कार्यकर्त्यांसह खामगाव पोलीस ठाणे गाठून तक्रारच दाखल केली. आ. शिंगणे किंवा महाविकास आघाडीच्या कुठल्याही नेत्यांकडून वंचितच्या नेत्यांसोबत बोलणे झालेले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. आ. शिंगणे यांनी चुकीचे वक्तव्य करत मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. हा आचारसंहितेचा भंग असून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी अमलकार यांनी तक्रारीद्वारे केली आहे.
—————–