-सतीश कांबळे यांनी स्वतः रेखाटलेले हस्तचित्र भेट देऊन केला सन्मान
लोणार (वाजिद खान) : लोणार शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख समद शेख अहमद आणि तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अश्रूजी फुके यांनी १ नोव्हेंबर रोजी नवी दिल्ली येथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा खासदार मुकुलजी वासनिक यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी लोणार शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांना पुष्पगुच्छ आणि स्वतःच्या हाताने रेखाटलेले त्यांचे आकर्षक हस्तचित्र भेट देऊन सन्मानित करण्यात आले.
या भेटीचे विशेष आकर्षण म्हणजे सतीश कांबळे यांनी खासदार मुकुलजी वासनिक यांचे छायाचित्र स्वतःच्या हाताने रेखाटून सुंदर कलाकृती साकारली होती. सतीश कांबळे हे काँग्रेसचे माजी जिल्हा सरचिटणीस साहेबराव पाटोळे यांचे आत्येभाऊ आहेत. त्यांच्या कलाकौशल्यातून साकारलेले हे हस्तचित्र साहेबराव पाटोळे यांच्या माध्यमातून नवी दिल्ली येथे मुकुलजी वासनिक यांना सप्रेम भेट देण्यात आले. यावेळी काँग्रेसचे माजी जिल्हा सरचिटणीस साहेबराव पाटोळे, माजी पंचायत समिती सभापती ज्ञानेश्वर चिभडे, युवा काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास मोरे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. या सदिच्छा भेटीच्या माध्यमातून लोणार शहर व तालुका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाशी संवाद साधला. तसेच सतीश कांबळे यांनी स्वतःच्या हाताने साकारलेल्या कलाकृतीमुळे या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले.