उकाडा, मच्छरांचा त्रास आणि वारंवार होणाऱ्या बिघाडाने ग्रामस्थ त्रस्त; अख्खी रात्र जागून काढण्याची वेळ!
मेहकर (तालुका प्रतिनिधी): तालुक्यातील सुमारे १० ते १२ हजार लोकवस्तीचे मोठे गाव असलेल्या देऊळगाव साखरशा येथे विजेच्या अनागोंदी कारभाराचा फटका ग्रामस्थांना बसला आहे. खामगाव रोडवरील टावरजवळ (पेट्रोल पंपानजीक) असलेला वीज ट्रान्सफॉर्मर (डीपी) शुक्रवारी (१० ऑक्टोबर) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास अचानक जळाला. यामुळे बस स्थानक परिसर, अकोला रोड झोपडपट्टी, शिक्षक कॉलनी आणि आश्रम शाळा परिसरासह गावाचा मोठा भाग अंधारात बुडाला आहे.
सध्या कडक उन्हाळ्यासारखे वातावरण असून, त्यातच वाढलेला मच्छरांचा प्रादुर्भाव आणि प्रचंड उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांवर अख्खी रात्र जागून काढण्याची वेळ ओढवली आहे. विशेष म्हणजे, हीच डीपी गेल्या दीड ते दोन महिन्यांपूर्वी सलग तीन दिवसांत दोन ते तीन वेळा जळाली होती. वारंवार ट्रान्सफॉर्मर जळण्याच्या या प्रकारामुळे महावितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
प्रशासन काय म्हणाले?
- “सदर ट्रान्सफॉर्मरची तातडीने दुरुस्ती करून वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.” — कानफाडे व निलेश राठोड (वायरमन)
- “उद्या (११ ऑक्टोबर) सकाळी लवकरच देऊळगाव साखरशा येथे नवीन ट्रान्सफॉर्मर पाठवला जाईल.” — अमोल बेंडेवार (कनिष्ठ अभियंता, महावितरण, जानेफळ)