-तहसीलदार विजय संवडे यांचे आदेश; शेतकरीनिहाय वस्तुनिष्ठ पंचनाम्यांसाठी महसूल, ग्रामपंचायत व कृषी विभागाचे संयुक्त पथक कार्यरत
चिखली (अंकुश पाटील) : चिखली तालुक्यात सन २०२६ च्या खरीप हंगामात दुष्काळामुळे बाधित झालेल्या शेती पिके, बागायत व फळबागांच्या नुकसानीचे शेतकरीनिहाय वस्तुनिष्ठ पंचनामे तातडीने करण्याचे आदेश महसूल प्रशासनाने दिले आहेत. मदत व पुनर्वसन विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या शासन निर्णयानुसार तसेच जिल्हाधिकारी, बुलढाणा यांच्या निर्देशानुसार तालुक्यात पंचनाम्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे.
नुकसानीचे अचूक मूल्यांकन व्हावे यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावासाठी ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेवक) आणि सहायक कृषी अधिकारी यांचे संयुक्त पथक नियुक्त करण्यात आले आहे. या पथकांमार्फत बाधित पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकरीनिहाय नुकसानीची नोंद करण्यात येणार आहे. पंचनाम्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी शेतातील नुकसानीचे जिओ-टॅग (Geo-tagged) फोटो घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष नुकसानीची नोंद अचूक पद्धतीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नुकसानीचा शेतकरीनिहाय अहवाल विहित नमुन्यात तयार करून त्याची सॉफ्ट कॉपी ई-मेलद्वारे तसेच स्वाक्षरीसह हार्ड कॉपी तहसील कार्यालयात विनाविलंब सादर करण्याचे स्पष्ट आदेश कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. हा अहवाल Excel Sheet तसेच अ, ब, क, ड प्रपत्रात तयार करून ३ ऑक्टोबर २०२६ पर्यंत तहसील कार्यालयात सादर करण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे.
११ महसूल मंडळांमध्ये दैनंदिन आढावा
चिखली तालुक्यातील चिखली, हातणी, धोडप, उदयनगर, अमडापूर, पेठ, एकलारा, चांधई, कोलारा, मेरा खुर्द आणि शेलगाव अटोळ या सर्व ११ महसूल मंडळांतील मंडळ अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिनस्त गावांचा दैनंदिन आढावा घ्यावा. तसेच विहित नमुन्यातील माहिती वेळेत कार्यालयास सादर होईल, याची वैयक्तिक दक्षता घ्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. पंचनाम्याच्या कामकाजात कोणतीही हयगय होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. बाधित शेतकऱ्यांपर्यंत शासनाकडून योग्य ती मदत पोहोचविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे तहसीलदार विजय संवडे यांनी स्पष्ट केले आहे.