-तालुक्यात ५० टक्केही पाऊस न झाल्याने पिके करपू लागली; शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर निवेदन देत तीव्र आंदोलनाचा इशारा
सिंदखेडराजा (अशोक इंगळे) : सिंदखेडराजा तालुक्यात यावर्षी ५० टक्केसुद्धा पाऊस न झाल्याने खरीपाची पिके धोक्यात आली आहेत. पाणी उपलब्ध आहे; मात्र वीज नसल्याने पिकांना पाणी देता येत नाही. अशा विविध समस्या घेऊन माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी तहसील कार्यालय, वीज वितरण कंपनीचे अधिकारी तसेच बँकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत निवेदन सादर करून समस्या सोडविण्याची मागणी केली. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील सर्वच गावांमध्ये सरासरीपेक्षा ५० टक्के कमी पाऊस पडल्याने माळरानावरील पिके करपू लागली आहेत. सोयाबीन तर हातचे गेल्यात जमा आहे. कपाशी आणि तूर या पिकांनी पाण्याअभावी माना टाकायला सुरुवात केली आहे. या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेऊन सिंदखेडराजा तालुका कोरडा दुष्काळ म्हणून घोषित करावा तसेच पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत करावी, अशी मागणी उपविभागीय अधिकारी संजय खडसे आणि तहसीलदार अजित दिवटे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. ई-पिक पाहणी करताना संबंधित प्रतिनिधी फोन घेत नाहीत आणि शेतकऱ्यांना मदत करीत नसल्याचा आरोप काही शिवसैनिकांनी तहसीलदार अजित दिवटे यांच्याकडे केला.
ज्या शेतकऱ्यांकडे जिरायती शेती असून विहीर आहे; मात्र पाणी देण्यासाठी वीजपुरवठा नियमित नाही, अशा शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी उपविभागीय अभियंता, सिंदखेडराजा यांच्याकडे करण्यात आली आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेतूनही अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर झाली आहे, त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही, नवीन अर्ज दाखल करून घेतले जात नाहीत तसेच त्यांच्यासोबत अरेरावीची भाषा वापरली जाते, अशा तक्रारी करण्यात आल्या. याबाबत बँकेत जाऊन अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्याची भूमिका घ्यावी, अशी सक्त ताकीद देण्यात आली. शेतकऱ्यांची अवहेलना करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. शेतकऱ्यांना योग्य न्याय द्यावा, अशी मागणी माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या शिष्टमंडळाने आज विविध कार्यालयांना भेटी देऊन केली. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबुराव मोरे, संपर्कप्रमुख शिवा ठाकरे, युवासेना तालुकाप्रमुख संदीप मगर, अतिष तायडे, सुदाम काकड, श्रीनिवास खेडेकर, छोटू पवार, बाळाजी मेहेत्रे यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.