– ‘देता की जाता’ म्हणत आंदोलनाचा इशारा; मेहकर तालुक्यातील सुकलेल्या पिकांची बांधावर जाऊन पाहणी
मेहकर/ बुलढाणा (बाळू वानखेडे) – गेल्या दीड महिन्यापासून पावसाने मारलेली दडी आणि त्यामुळे वाळून गेलेली पिके यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचा शासनाने आता अंत पाहू नये. राज्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करून पीडित शेतकऱ्यांना सरसकट एकरी २५ हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी जोरदार मागणी मेहकरचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी केली आहे. ‘सरकारने मदत द्यावी, अन्यथा खुर्ची सोडावी’ असा थेट इशारा देत त्यांनी ‘देता की जाता’ या भूमिकेतून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला.
पावसाअभावी हाताशी आलेले पीक जळून गेल्याने तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. बुधवारी (९ सप्टेंबर) आमदार सिद्धार्थ खरात यांनी देऊळगाव साखरशा, पारखेड, मांडवा, वडाळी, नायगाव दत्तापूर यांसह विविध गावांतील शेतशिवारात जाऊन पिकांची थेट बांधावर पाहणी केली. सोयाबीन, कपाशी, मका, तूर, उडीद व मूग या पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून सोयाबीन आणि कपाशीची पिके अक्षरशः करपून गेली आहेत. या कठीण प्रसंगी खचून जाऊ नका, आम्ही सर्वतोपरी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असा धीर त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला. माध्यमांशी बोलताना आमदार खरात यांनी प्रशासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत, पीक विमा आणि इतर आवश्यक शासकीय सवलती लागू कराव्यात, अशी मागणी केली.
या पाहणी दौऱ्याप्रसंगी तहसीलदार निलेश मडके, तालुका कृषी अधिकारी किशोर काळे, नायब तहसीलदार नितीन बोरकर, ज्येष्ठ पत्रकार बाळू वानखडे, माजी उपसरपंच रणजीत देशमुख, शाम निकम, मंडळ अधिकारी सचिन कापसे, गणेश महाजन, कृषी सहाय्यक शिरसाट, तलाठी बालाजी माने, गजानन राठोड, शाखा प्रमुख दिगंबर अल्हाट, रतन सावजी, शे. चांद कुरेशी, शे. गुलाब, नरेंद्र पवार, नरेश साठे, वासुदेव सरदार, पीक पाहणी सहाय्यक किशोर चव्हाण, मांगू महाराज, सुभाष पवार, माजी उपसरपंच मांगीलाल राठोड, पंडित देशमुख, पिंटू पाटील, रणजीत चव्हाण यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.