-नागलवाडीच्या डोंगरकुशीत विहिरीची पाणीपातळी वाढली; अवघ्या दीडशे फुटांवरील खासगी विहीर कोरडी ठाक
शेवगाव (बाळासाहेब खेडकर) : भगवानगडाच्या पायथ्याशी नागलवाडी-बोधेगाव रस्त्यालगत डोंगराच्या कुशीत भगवानगडाच्या शेतजमिनीला लागून असलेली एक विहीर सध्या परिसराचे लक्ष वेधून घेत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने परिसरात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तलाव, बंधारे तसेच अनेक विहिरींची पाणीपातळी दिवसेंदिवस खालावत असताना या विहिरीची पाणीपातळी मात्र कमी होण्याऐवजी कायम राहून वाढत असल्याची माहिती बाळासाहेब ढाकणे यांनी दिली.
भगवानगडावर संत ज्ञानेश्वर माऊली मंदिराचे बांधकाम अत्यंत वेगाने सुरू आहे. तसेच येथे अखंडपणे २४ तास अन्नदान सुरू असून, भाविकांना पिण्यासाठी तसेच गडावरील गोशाळेतील गोधनासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. या सर्व कामांसाठी याच विहिरीतील पाण्याचा वापर केला जात आहे. सातत्याने पाण्याचा उपसा होत असतानाही विहिरीतील पाण्याची पातळी टिकून असून, उलट ती वाढत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे ही विहीर सध्या परिसरात चर्चेचा विषय बनली आहे. या विहिरीतील पाणीपातळी वाढल्याची माहिती सोशल मीडियावर तसेच परिसरात पसरताच अनेक नागरिकांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. एकीकडे पावसाने पाठ फिरवल्याने परिसरातील जलस्रोत आटत आहेत, तर खरिपातील पिके पुरेशा पावसाअभावी जळून चालली आहेत. मात्र, डोंगराच्या कुशीत असलेल्या या विहिरीत मुबलक पाणीसाठा कायम टिकून आहे. त्यामुळे ही भगवानगडाला निसर्गाची अनोखी साथ असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.
विशेष म्हणजे, या विहिरीपासून अवघ्या दीडशे फुटांवर नागलवाडी येथील शेतकरी बबनराव ढाकणे यांची खासगी विहीर आहे. मात्र, या विहिरीतील पाणीसाठा अत्यल्प असून ती जवळपास कोरडी ठाक झाली आहे. एकाच परिसरात आणि अवघ्या दीडशे फुटांच्या अंतरावर असलेल्या दोन विहिरींच्या पाणीपातळीत एवढी मोठी तफावत असल्याने हा विषय सध्या परिसरात कुतूहलाचा ठरला आहे. भगवानगडावर संत ज्ञानेश्वर माऊली मंदिराचे बांधकाम, २४ तास सुरू असलेले अन्नदान तसेच गोशाळेतील गोधनासाठी सातत्याने पाण्याचा वापर होत असतानाही या विहिरीतील पाणीसाठा कमी होत नसल्याने भाविकांमध्येही आश्चर्य व्यक्त होत आहे. भगवानगडाचे संत भगवानबाबांशी असलेले आध्यात्मिक नाते सर्वश्रुत आहे. संत भगवानबाबांनी पाण्यावर गाथा वाचन केल्याची परंपराही सांगितली जाते. त्यामुळे या परिसरातील विहिरीत पाणी टिकून राहणे ही संत भगवानबाबांची कृपा आणि निसर्गाची साथ असल्याची भावना अनेक भाविकांकडून व्यक्त केली जात आहे.
जलस्रोताचा शास्त्रीय अभ्यास होण्याची गरज
या विहिरीला पाण्याचा नैसर्गिक स्रोत नेमका कोणता आहे, याचा शास्त्रीयदृष्ट्या अभ्यास झाल्यास पाणीपातळी कायम राहण्यामागील कारण स्पष्ट होऊ शकते. सध्याच्या दुष्काळजन्य परिस्थितीत परिसरातील जलस्रोतांची पाणीपातळी खालावत असताना भगवानगडाच्या पायथ्याशी असलेली ही विहीर मात्र तुडुंब आहे. पावसाची प्रतीक्षा असतानाही या विहिरीने भगवानगडावरील ज्ञानेश्वर मंदिराचे बांधकाम, दररोजचे अन्नदान आणि गोशाळेतील गोधनासाठी पाण्याचा मोठा आधार दिला आहे. त्यामुळे या विहिरीची निसर्गाची साथ सध्या नागलवाडी परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे.
चौकट : ‘साधुसंतांच्या कृपेने कोणतीच गोष्ट कमी पडत नाही’
संत भगवानबाबांनी सुरू केलेल्या वारकरी संप्रदायाची पताका भगवानगड परिसरात अखंडपणे सुरू आहे. गडाच्या विकासासाठी परिसरातील नागरिकही आपल्या परीने हातभार लावत आहेत. साधुसंतांच्या कृपेने भगवानगडावर कोणतीच गोष्ट कमी पडत नाही, अशी भावना नागलवाडीचे माजी सरपंच संजय वडते यांनी व्यक्त केली.