– शेतकरी संकटात असल्याचे सांगत ‘क्रांतिकारी’चा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा
– पिकांचे पंचनामे, कर्जमाफी आणि वीजप्रश्नावर तातडीने निर्णयाची मागणी
बुलढाणा (बाळू वानखेडे) – महिन्याभरापासून पावसाने मारलेली दडी आणि वाढत्या उन्हामुळे करपून चाललेली पिके अशा दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेने केली आहे. संघटनेचे संस्थापक रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखालील राज्यस्तरीय शिष्टमंडळाने आज (दि.2 सप्टेंबर) जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना या संदर्भातील निवेदन सादर केले. पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे राज्यातील खरीप हंगाम पुरता धोक्यात आला असून, शासनाने तातडीने दुष्काळी उपाययोजना लागू न केल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही या वेळी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
बुलढाणा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या महिनाभरापासून पावसाने पाठ फिरवल्यामुळे विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्याअभावी सोयाबीन, कापूस, उडीद, मूग, तूर आणि मका यांसारखी प्रमुख खरीप पिके पूर्णपणे वाळून जाण्याच्या मार्गावर आहेत. पिकांची वाढ खुंटल्याने आणि ती करपू लागल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. बियाणे, खते, औषधे आणि शेती मशागतीसाठी कर्ज घेतलेला शेतकरी पुन्हा एकदा प्रचंड आर्थिक आणि मानसिक ताणाखाली आला असून पुढील दोन दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास संपूर्ण पिके नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर रविकांत तुपकर यांच्यासह संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजीव कसबे, युवा प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण मोरे, मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे आणि जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन शेतकरी संकटात असल्याचे स्पष्ट केले. महसूल व कृषी विभागामार्फत तातडीने पिकांचे पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी भरीव आर्थिक मदत देणे, पीक कर्जांना स्थगिती देऊन संपूर्ण कर्जमाफीबाबत ठोस निर्णय घेणे, तसेच पीक विम्याची नुकसानभरपाई तातडीने मंजूर करून वितरित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
त्याचप्रमाणे, शेतीपंपांना नियमित व पुरेशा वेळेत वीज उपलब्ध करून देणे, जळालेले ट्रान्सफॉर्मर तत्काळ बदलून देणे, सिंचनाचे नियोजन करून टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे, जनावरांसाठी चारा छावण्या उभारणे, ग्रामीण भागात मनरेगाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू करणे आणि शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी विशेष मदत व समुपदेशन यंत्रणा कार्यान्वित करणे अशा विविध मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. या प्रसंगी मिसाळवाडीचे सरपंच बाळू पाटील, उपसरपंच तथा क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे युवा नेते हनुमान मिसाळ, अमोल मोरे, ॲड. प्रवीण सुरडकर, सुनील मिसाळ, नितीन सोनटक्के, निलेश राजपूत यांच्यासह क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.