– धाराशीवमधील गौरगावच्या माने दाम्पत्याला मिळाला मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मानाचा बहुमान
– अवघी पंढरी विठ्ठलमय; बळीराजाच्या सुखासाठी, महाराष्ट्राच्या समृद्धीसाठी मुख्यमंत्र्यांचे विठूमाऊलीकडे साकडे!
पंढरपूर (धम्मप्रिया कांबळे) : ‘विठू माऊलीचा गजर’ आणि ‘ज्ञानेश्वर माऊली-तुकाराम’च्या जयघोषात अवघी पंढरी दुमदुमून गेली आहे. आषाढी एकादशीनिमित्त लाडक्या विठुरायाचे आणि रुक्मिणीमातेचे दर्शन घेण्यासाठी पंढरपुरात १५ लाखांहून अधिक भाविकांचा अलोट जनसागर लोटला आहे. राज्याच्या विविध भागांत झालेल्या समाधानकारक पावसामुळे यंदाच्या वारीत कमालीचा उत्साह दिसून येत असून, पुढील काही तासांत हा आकडा ३५ लाखांच्या पार जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शनिवारी पहाटे ३ च्या सुमारास श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते परंपरेनुसार पार पडली. यंदा मुख्यमंत्र्यांसमवेत महापूजेचा मानाचा वारकरी दाम्पत्य म्हणून बहुमान धाराशिव जिल्ह्यातील गौरगावचे शेतकरी बाबासाहेब माने (वय ७०) आणि प्रभावती माने (वय ६८) यांना मिळाला. हे दाम्पत्य गेल्या २० वर्षांपासून नियमित पंढरपूरची वारी करत आहे.
असा पार पडला महापूजेचा सोहळा
महापूजेपूर्वी मध्यरात्री १२.४५ वाजता श्री विठ्ठल-रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन तात्पुरते बंद करण्यात आले होते. १ ते १.४५ दरम्यान मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि शिवाजीराव मोरे यांच्या हस्ते नित्यपूजा झाली. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांचे मंदिर परिसरात सपत्नीक आगमन झाले. पहाटे २.२० ते ३ वाजेपर्यंत श्री विठ्ठलाची, तर ३ ते ३.३० दरम्यान रुक्मिणीमातेची शासकीय महापूजा संपन्न झाली.
या प्रसंगी श्री विठ्ठलास मुख्यमंत्र्यांनी भेट दिलेला बनारसी सिल्कचा लाल-केशरी रंगाचा पोशाख आणि रुक्मिणीमातेस लाल-हिरव्या रंगाची येवला पैठणी परिधान करण्यात आली होती. महापूजा संपन्न होताच भाविकांसाठी पदस्पर्श दर्शन पुन्हा सुरू करण्यात आले. यानंतर सभामंडपात मंदिर समितीच्यावतीने मुख्यमंत्री आणि मानाच्या वारकरी दाम्पत्याचा नागरी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला पालकमंत्री जयकुमार गोरे, सोनिया गोरे, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके उपस्थित होते.
पालख्यांचे जल्लोषात स्वागत
तत्पूर्वी, शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसह संत एकनाथ, संत निवृत्तीनाथ, संत चांगदेव, संत सोपानदेव, संत मुक्ताबाई, रुक्मिणीमाता, संत निळोबाराय आणि संत नामदेव महाराज यांच्या मानाच्या पालख्या पंढरपुरात दाखल झाल्या. इसबावी विसावा येथे प्रशासनाच्या वतीने पालख्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी पंढरपूरकरांनी माउली आणि तुकोबांच्या पालखीवर मोठ्या प्रमाणावर पुष्पवृष्टी केली.
दर्शनरांग स्वेरी कॉलेजच्या पार; प्रशासन सज्ज
भक्तांच्या अलोट गर्दीमुळे पंढरपुरातील मुक्कामाची सर्व ठिकाणे भरली गेली आहेत. भाविक मिळेल तिथे तंबू व राहुट्या उभारून थांबले आहेत. मंदिर समितीने दर्शनरांगेत उभारलेली अतिरिक्त पत्राशेड्सही अपुरी पडत असून, दर्शनाची रांग गोपाळपूरच्या पुढे ‘स्वेरी कॉलेज’पर्यंत पोहोचली आहे. प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस कर्मचारी, होमगार्ड आणि विशेष पथके तैनात केली असून संपूर्ण शहरावर ‘सीसीटीव्ही’ची नजर आहे. प्रसादासह विविध वस्तूंची दुकाने सजली असून, या विक्रमी गर्दीमुळे यंदा पंढरपुरात मोठी आर्थिक उलाढाल होईल, असा विश्वास व्यापारी वर्गाकडून व्यक्त केला जात आहे.