-खडकपूर्णा प्रकल्पातील कथित अवैध रेती उपशावर युवा सेनेचा एल्गार; प्रशासनाला निवेदन, ८ जुलैपासून आंदोलनाचा इशारा
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) : खडकपूर्णा प्रकल्प परिसरात सुरू असल्याचा आरोप करण्यात आलेल्या कथित अवैध रेती उपशावर तातडीने कठोर कारवाई करावी, अन्यथा जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्या विरोधात काळे फासो आंदोलन छेडण्यात येईल, असा तीव्र इशारा युवा सेना उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील भुतेकर आणि मंडपगावचे सरपंच सचिन कदम यांनी दिला आहे. यासंदर्भात त्यांनी २ जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की, खडकपूर्णा प्रकल्पातून अनेक वर्षांपासून बोटींच्या माध्यमातून कथितपणे रेतीचा उपसा सुरू असून मंडपगाव, चिंचखेड आणि सुलतानपूर मार्गावरून टिप्पर व ट्रॅक्टरद्वारे मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे. या कथित अवैध वाहतुकीमुळे ग्रामीण भागातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून शासनाच्या महसुलालाही मोठा फटका बसत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यापूर्वी अनेक आंदोलने, निवेदने आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर काही काळ रेती उपसा बंद झाला होता. मात्र, प्रशासनाने सीसीटीव्ही यंत्रणा उभारल्यानंतरही पुन्हा कथित अवैध रेती उपसा सुरू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. सीसीटीव्ही देखरेख असूनही एकाही वाहनावर कारवाई झालेली नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. निवेदनात काही महसूल कर्मचाऱ्यांवर निष्क्रियतेचे आणि रेती उपशाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. संबंधित मंडळ अधिकारी व तलाठ्यांची चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करावे, तसेच रेती उपसा करणाऱ्या बोटी, टिप्पर आणि ट्रॅक्टर जप्त करून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय संबंधित परिसरात स्वतंत्र शासकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करून सीसीटीव्हीच्या माध्यमातून २४ तास देखरेख ठेवावी आणि अवैध वाहतुकीवर तातडीने कारवाई करावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, यापूर्वी अवैध रेती उपशाविरोधातील आंदोलनादरम्यान तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांची उपरोधात्मक तेरवी घालण्याची वेळ आंदोलनकर्त्यांवर आली होती. अशी वेळ विद्यमान जिल्हाधिकाऱ्यांवर येऊ नये. प्रशासनाने वेळेत कठोर कारवाई करून जनतेचा रोष टाळावा, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. प्रशासनाने चार दिवसांच्या आत ठोस कारवाई केली नाही, तर ८ जुलै २०२६ पासून जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्या विरोधात तीव्र आंदोलन तसेच काळे फासो आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा युवा सेना उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील भुतेकर आणि सरपंच सचिन कदम यांनी दिला आहे. या निवेदनाच्या प्रती महसूल मंत्री, महसूल आयुक्त, उपविभागीय अधिकारी, सिंदखेडराजा तहसीलदार, देऊळगाव राजा तहसीलदार, बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच अंढेरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांनाही देण्यात आल्या आहेत.