-बुलढाणा पोलिस व भारतीय सैन्य दलाकडून शस्त्र सलामी; हजारो नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार
-‘शहीद अंकुश मिसाळ अमर रहे’च्या घोषणांनी दुमदुमला मेहुणाराजा परिसर; देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीरपुत्राला अश्रुपूर्ण निरोप
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) : ग्राम मेहुणाराजा येथील भारतीय सैन्यात कार्यरत असलेले जवान अंकुश महादेव मिसाळ यांचे पार्थिव गावी पोहोचताच संपूर्ण गावासह पंचक्रोशीवर शोककळा पसरली. देशरक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या या वीर जवानावर सोमवारी (दि. २९ जून २०२६) मेहुणाराजा येथील जिल्हा परिषद शाळेजवळ शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी बुलढाणा पोलिस दल आणि भारतीय सैन्य दलाने शस्त्र सलामी देऊन शहीद जवानाला अखेरचा सलाम केला.
अंत्ययात्रेदरम्यान “भारत माता की जय”, “वंदे मातरम्” आणि “शहीद अंकुश मिसाळ अमर रहे” या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. मातृभूमीच्या रक्षणासाठी जीवन अर्पण करणाऱ्या या वीरपुत्राला अखेरचा निरोप देताना नागरिकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते. शहीद जवानाच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. पार्थिवावर अंत्यसंस्कार होत असताना कुटुंबीयांचा आक्रोश उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी आणणारा होता. कुटुंबाचा आधारवड हरपल्याने संपूर्ण मिसाळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. यावेळी नाईक सुभेदार निरज कुमार (हेडक्वार्टर, भुसावळ) यांनी सैनिकी मानवंदना अर्पण केली. तसेच जिल्हा सैनिक अधिकारी रंजन सरकटे, सैनिक कल्याण कार्यालयाचे अर्जुन गाडेकर, हवालदार विलास दाभाडे, उपविभागीय अधिकारी संजय खडसे, तहसीलदार वैशाली डोंगरजाळ, पोलीस निरीक्षक ब्रम्हा गिरी, जिल्हा सैनिक संघटनेचे अध्यक्ष शिवानंद उबाळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
यावेळी सतीश कायंदे, नंदाताई कायंदे, माजी आमदार तोताराम कायंदे, डॉ. शशिकांत खेडेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य धनसिंग शिंगणे, भगवान मुंढे, सविताताई मुंढे तसेच मेहुणाराजाचे सरपंच विष्णू बोंद्रे यांनीही शहीद जवानाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. अंत्यसंस्कारासाठी पंचक्रोशीतील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, माजी सैनिक, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वीर जवानाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होताच उपस्थित प्रत्येकाच्या मनात देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या या सुपुत्राबद्दल अभिमानासह दुःखाची भावना दाटून आली. देशरक्षणासाठी प्राणांची आहुती देणारे जवान अंकुश महादेव मिसाळ यांच्या शौर्याची आणि देशसेवेची प्रेरणा भावी पिढ्यांसाठी कायम स्मरणात राहील, अशा भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केल्या. “वीर जवान गेला, पण त्याचे शौर्य आणि देशसेवेचा आदर्श सदैव जिवंत राहील,” अशा शब्दांत उपस्थितांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.