-लाखो रुपयांचे नुकसान; शासनाकडून तातडीच्या मदतीची मागणी
चिखली (अंकुश पाटील) : तालुक्यातील भरोसा येथील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील शेडनेट गृहांचे अलीकडील वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेडनेटमधील पिकांसाठी तयार करण्यात आलेले बेडही उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
भरोसा येथील शेतकरी भानुदास श्रीराम थुट्टे (गट क्र. ५३४), केशव श्रीराम थुट्टे (गट क्र. ३८८), विष्णू श्रीराम थुट्टे (गट क्र. ६), योगेश दगडू वाघमारे (गट क्र. ५६१), दगडू सखाराम वाघमारे (गट क्र. ५६२), आत्माराम नामदेव थुट्टे (गट क्र. ५७३), अंकुश भानुदास थुट्टे (गट क्र. ३५६), ज्ञानेश्वर प्रकाश साबळे (गट क्र. १३), गणपत भगत (गट क्र. १०३) तसेच अरुण शिंदे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांनी प्रत्येकी सुमारे २,०८० चौरस मीटर क्षेत्रफळाचे शेडनेट गृह उभारले होते. या शेडनेटसाठी शासनाकडून अनुदानही मिळाले होते. कृषी विभागामार्फत राबविण्यात आलेल्या ‘पोखरा’ योजनेअंतर्गत भरोसा येथे अंदाजे ४० शेडनेट उभारण्यात आले आहेत. या शेडनेटमध्ये विविध भाजीपाला पिके, टोमॅटो, कारले, झेंडू तसेच विविध कंपन्यांच्या बीजोत्पादनाचे कार्यक्रम राबविले जातात. मात्र यावर्षीच्या पहिल्याच पावसात वादळी वाऱ्यामुळे शेडनेटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वारंवार झालेल्या वादळ आणि पावसामुळे अनेक शेडनेट उडून गेले, तर काहींचे लोखंडी पाइप वाकून पडले आहेत.
काही शेतकऱ्यांनी स्वतःच्या खर्चाने शेडनेटची दुरुस्ती केली असली तरी अनेकांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांना नुकसान भरून काढणे कठीण झाले आहे. शेतकऱ्यांचा आरोप आहे की, कृषी विभागाकडून दुरुस्तीसाठी मदत मिळण्याऐवजी नोटिसा देऊन मानसिक त्रास दिला जात आहे. लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या शेडनेट गृहांचे नुकसान झाल्याने शासनाने त्वरित पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी बाधित शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांची आर्थिक अडचण दूर करण्यासाठी विशेष मदत पॅकेज जाहीर करावे, अशी अपेक्षाही शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.