-गुरव फडावर कीर्तन सेवा हरिनाम गजरात; माऊली मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी
आळंदी (अर्जुन मेदनकर) : श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने एकादशीदिनी परंपरेप्रमाणे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. श्रींच्या गाभाऱ्यात आकर्षक पुष्पसजावट करण्यात आली होती. मंदिरात श्रींच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. मात्र, मंदिरातील दर्शनबारीचे नियोजन व्यवस्थित नसल्याने भाविकांना गैरसोयींचा सामना करावा लागला. नाहक चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाल्याने काही भाविकांनी संताप व्यक्त केला. दर्शनबारीचे नियोजन फसल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
मंदिरातील अनेक दरवाजे बंद ठेवण्यात आल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त करत स्थानिक नागरिकांना याबाबत कळविले. त्यानंतर पोलीस प्रशासन व महसूल प्रशासनाच्या सूचनेनुसार संबंधित दरवाजे पुन्हा खुले करण्यात आले. आळंदीतील इंद्रायणी नदी घाटावर परंपरेनुसार कीर्तन सेवा हरिनाम गजरात पार पडली. इंद्रायणी आरती सेवा समितीच्या वतीने इंद्रायणी आरती उत्साहात संपन्न झाली. यावेळी संयोजिका अनिता झुंजम, अनिता शिंदे, सुवर्णा काळे, गोविंद ठाकूर, संयोजक अर्जुन मेदनकर आदी उपस्थित होते. समस्त आळंदीकर ग्रामस्थांच्या वतीने कीर्तन परंपरेचा एकमेव फड म्हणून वैकुंठवासी गुरुवर्य मारुतीबुवा गुरव आळंदीकर यांचा फड ओळखला जातो. या फडावर गेल्या शंभर वर्षांपासून प्रत्येक वद्य एकादशीला कीर्तन सेवा होत आहे. या फडावर अनेक नामवंत कीर्तनकारांची सेवा रुजू झाली आहे. त्यामध्ये हभप रंगनाथ महाराज परभणीकर, हभप धुंडा महाराज देगलुरकर, हभप किसन महाराज साखरे, हभप वक्ते महाराज बाबा आदींचा समावेश आहे. फडावरील ही परंपरा आजतागायत आळंदीत अखंडपणे सुरू असल्याची माहिती वंशज संकेत वाघमारे यांनी दिली.
कमला एकादशीदिनी इंद्रायणी सेवा समिती, आळंदी यांच्या वतीने इंद्रायणी आरतीपूर्वी देवतळे ऋषीकेश कीर्तनकार यांची कीर्तन सेवा रुजू झाली. यावेळी वादक कृष्णा महाराज घंगाळे तसेच गायक करण महाराज पाटील (पंढरपूरकर) यांनी साथ दिली. इंद्रायणी नदी घाटावर आळंदी देवस्थानतर्फे आयोजित इंद्रायणी आरतीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे, देवस्थानचे विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, रोहिणी पवार, निलेश महाराज लोंढे, योगी निरंजन नाथ, पुरुषोत्तम महाराज पाटील, व्यवस्थापक माऊली वीर आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी आळंदी देवस्थानला रुग्णवाहिका भेट दिली. यावेळी डॉ. राम गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.