अधिक मासातील गर्दीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरल्याने दुर्घटना; ७५ वर्षीय वृद्ध महिला गंभीर, प्रशासनाच्या निष्काळजीपणावर संताप
बीड / माजलगाव (अशोक इंगळे/वैभवी स्वामी) : अधिक मासानिमित्त पुरुषोत्तमपुरी येथे दर्शनासाठी आलेल्या भाविकांची बोट गोदावरी नदीपात्रात उलटल्याने दोन महिला भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर एक वृद्ध महिला गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून प्रशासनाच्या निष्काळजीपणाविरोधात संतापाची लाट उसळली आहे.
मृत महिलांमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील कांताबाई ज्ञानदेव आंधळे (वय ६०, रा. कुंभेफळ) आणि प्रमिला शेषराव राठोड (वय ५५, रा. चोरपांगरा) यांचा समावेश आहे. तर सिंधुबाई अर्जुन मावळे (वय ७५, रा. महागाव, जि. वाशिम) या गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अधिक मासानिमित्त पुरुषोत्तमपुरी येथे मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले होते. गोदावरी नदी ओलांडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बोटीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसविण्यात आल्याने नदीकाठाजवळच बोटीचा तोल गेला आणि ती उलटली. बोटीत असलेल्या भाविकांमध्ये एकच गोंधळ उडाला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक मच्छीमार आणि पोहण्यात तरबेज युवकांनी तातडीने नदीत उड्या घेत बचावकार्य सुरू केले. त्यांच्या तत्परतेमुळे अनेक भाविकांचे प्राण वाचले. अन्यथा मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अपघातातून बचावलेल्या काही महिला भाविकांनी धक्कादायक अनुभव कथन केला. बोटीची क्षमता मर्यादित असतानाही चालकाने मोठ्या संख्येने प्रवाशांना बोटीत बसविले. काही महिलांनी गर्दी पाहून खाली उतरण्याचा प्रयत्न केला असता त्यांना तसे करू दिले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, पुरुषोत्तमपुरी येथे अधिक मास उत्सवानिमित्त मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असतानाही सुरक्षेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला जात आहे. दोन दिवसांपूर्वीही एक बोट नदीत उलटल्याची घटना घडली होती. त्याआधी १९ मे रोजी एका तरुणाचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला होता. या घटनांनंतरही प्रशासनाने आवश्यक खबरदारी घेतली नसल्याची भावना भाविकांमध्ये व्यक्त होत आहे. बोटींसाठी जीवरक्षक जॅकेटची सक्ती, प्रवासी क्षमतेचे पालन आणि सुरक्षेचे नियम काटेकोरपणे राबविण्यात आले असते, तर ही दुर्घटना टळू शकली असती, असे नागरिकांचे म्हणणे आहे. या घटनेनंतर प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.