-महावितरण कर्मचाऱ्यांना काठीने मारहाण; सरकारी कामात अडथळा प्रकरणी गुन्हा दाखल
बिबी (ऋषी दंदाले) : लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू येथे वीज चोरीविरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला झाल्याची गंभीर घटना २६ मे रोजी दुपारी घडली. या घटनेत दोन कर्मचारी जखमी झाले असून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी बिबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बिबी येथील महावितरण कार्यालयातील कर्मचारी तसेच मुंबई मुख्य कार्यालयातून आलेले विशेष पथक किनगाव जट्टू येथे वीज चोरी संदर्भात तपासणीसाठी गेले होते. दुपारी बारा ते एक वाजण्याच्या सुमारास बाजार गल्ली परिसरात ग्राहक अनिल भगवान नागरे यांच्या घरातील मीटर व केबल जोडणीची तपासणी सुरू होती. तपासणी सुरू असतानाच अनिल नागरे हा हातात बांबूची काठी घेऊन घटनास्थळी आला आणि पथकातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या मारहाणीत प्रधान तंत्रज्ञ संजय खार्डे यांच्या कपाळाला गंभीर दुखापत झाली असून हात, पाठ व पायालाही मार लागला. तसेच सहाय्यक अभियंता समाधान पाटील यांच्या हाताला आणि खांद्याला दुखापत झाली आहे. मारहाणीदरम्यान आरोपीने संजय खार्डे यांचा मोबाईल हिसकावून घेतल्याचाही आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, घटनास्थळी उपस्थित असलेल्या ओम दिलीप आंधळे यांनी संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. इतर अधिकारी आणि कर्मचारी धावत आल्यानंतर जखमी कर्मचाऱ्यांची आरोपीच्या तावडीतून सुटका करण्यात आली.
घटनेनंतर पथकातील अधिकाऱ्यांनी डायल ११२ वर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जखमींना ग्रामीण रुग्णालय बिबी येथे उपचारासाठी दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना रेफर करण्यात आले आहे. या कारवाईत सहाय्यक अभियंता समाधान दिनकर पाटील, चंद्रकांत तान्हाजी पाटील, अक्षय गजानन वंजारी, अतुल संतोष बावस्कर, तंत्रज्ञ कोमल रामराव राठोड, विशाल महादेव वानखडे तसेच जीनस कंपनीचे कर्मचारी सहभागी होते. या प्रकरणी सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, मारहाण आणि धमकी देणे आदी कलमान्वये बिबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रविराज चव्हाण व पोलीस कर्मचारी करत आहेत.