– पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश; शेतकऱ्यांना प्राधान्याने डिझेल देणार!
– आमदार श्वेताताई महाले व सिद्धार्थ खरात यांच्या मागणीची प्रशासनाकडून गंभीर दखल
बुलढाणा/मेहकर (बाळू वानखेडे) : जिल्ह्यात निर्माण झालेल्या तीव्र डिझेल टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन पूर्णपणे सतर्क झाले आहे. सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि अत्यावश्यक सेवांना इंधनाचा पुरवठा सुरळीत व्हावा, तसेच साठेबाजी व काळाबाजार रोखला जावा, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण कुमार देवरे यांनी अत्यंत कडक पावले उचलली आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक पेट्रोल पंपावर महसूल व इतर विभागांच्या कर्मचाऱ्यांचे ‘बैठे पथक’ तैनात करण्याचे आदेश आज, २३ मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असून यासाठी एक विशेष जिल्हास्तरीय कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे.
दरम्यान, शेतीचा हंगाम तोंडावर असल्याने शेतकऱ्यांना प्राधान्याने डिझेल उपलब्ध करून देण्याचे निर्देश पालकमंत्री मकरंद पाटील आणि जिल्हाधिकारी डॉ. देवरे यांनी दिले आहेत. चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले यांनी कालच याप्रश्नी आक्रमक भूमिका घेतली होती. तसेच, मेहकरचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी या गंभीर समस्येकडे मंत्रालय आणि जिल्हा पातळीवर लक्ष वेधून घेत मागणी लावून धरली होती. त्यांच्या या मागणीची प्रशासनाने तात्काळ दखल घेतली आहे. तसेच चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले यांनीही यासंदर्भात मागणी केली होती.
जिल्हाधिकारी व तहसीलदारांच्या प्रत्यक्ष भेटी
या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी आज स्वतः जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण कुमार देवरे यांनी बुलढाण्यातील पेट्रोल पंपांना भेटी दिल्या. दुसरीकडे, मेहकरचे तहसीलदार निलेश मडके यांनी पुरवठा विभागाच्या पथकासह मेहकर शहरातील चार आणि उकळी येथील एक अशा पाच पेट्रोल पंपांची प्रत्यक्ष तपासणी केली. पंपांवर सध्या तलाठी आणि पोलीस पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून, शेतकऱ्यांना डिझेलचे वाटप कोणत्याही अडथळ्याविना सुरळीत करण्याचे निर्देश तहसीलदार मडके यांनी दिले आहेत.
प्रशासनाची नवीन कार्यपद्धती आणि कडक नियम:
- ‘बैठे पथक’ ठेवणार नजर: प्रत्येक पेट्रोल पंपावर तलाठी, मंडळ अधिकारी किंवा महसूल कर्मचाऱ्यांचे पथक तैनात राहील. गरज भासल्यास पोलीस कर्मचाऱ्यांचीही मदत घेतली जाईल. हे पथक दररोज सकाळी १० आणि सायंकाळी ६ वाजता तहसील कार्यालयाला अहवाल सादर करेल.
- कॅन, ड्रम आणि बाटल्यांमध्ये इंधन देण्यास बंदी: काळाबाजार रोखण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला खुल्या स्वरूपात पेट्रोल किंवा डिझेल दिले जाणार नाही. प्लास्टिक बाटल्या, कॅन, ड्रम किंवा बॅरलमध्ये इंधन देण्यावर पूर्णपणे प्रतिबंध घालण्यात आला आहे.
- स्टॉकची रोज तपासणी: पेट्रोल पंपावरील भूमिगत टाकीतील (Underground Tank) प्रत्यक्ष साठा आणि स्टॉक रजिस्टरमधील नोंद यांची सकाळी व सायंकाळी पडताळणी केली जाईल. यात तफावत आढळल्यास कडक कारवाई होईल.
- माहिती फलक लावणे बंधनकारक: प्रत्येक पेट्रोल पंपाच्या दर्शनी भागात उपलब्ध साठा, राखीव साठा आणि वितरणाची वेळ दर्शवणारा फलक नागरिकांना दिसेल अशा ठिकाणी लावणे सक्तीचे केले आहे.
- अत्यावश्यक सेवांना राखीव साठा: ॲम्बुलन्स, अग्निशामक दल, पाणीपुरवठा वाहने आणि शासकीय वाहने यांसारख्या आपत्कालीन सेवांसाठी प्रत्येक पंपावर राखीव साठा ठेवण्यात येईल.
कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन
पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांब रांगा किंवा गर्दी झाल्यास तात्काळ तालुका नियंत्रण कक्ष आणि पोलिसांना कळवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी स्वतंत्र रांगा लावल्या जातील. “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य” या तत्त्वाचा वापर केला जाईल. इंधन उपलब्ध असतानाही जर एखादा पेट्रोल पंप बंद आढळला, तर त्याची तात्काळ चौकशी करून कडक कारवाई प्रस्तावित केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.
बळीराजाचा उद्रेक! शेतमालाला भाव नाही अन् पेरणीला डिझेल मिळेना; मेरा चौकीत शेतकऱ्यांचा ‘चक्काजाम’!
