– लातूरच्या ‘ट्युशन लॉबी’ला दणका; ११ तासांच्या मॅरेथॉन चौकशीनंतर पापाचा घडा भरला!
– एनटीएच्या दलालांशी संधान साधून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणारा ‘गोल्ड मेडलिस्ट’ गजाआड!
– शंभर कोटींची उलाढाल करणारी ‘डॉक्टर घडवणारी फॅक्टरी’ की पेपर विकणारा कारखाना?
– लातूर ते पुणे सीबीआयने आवळला पाश; भ्रष्टाचाराच्या अंधाऱ्या दुनियेचा बुरखा टराटरा फाडला!
पुणे/लातूर (सोनल बडगुजर) : देशभरात प्रचंड खळबळ उडवून दिलेल्या ‘नीट’ (NEET) पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) सोमवारी अत्यंत मोठी आणि धक्कादायक कारवाई केली आहे. लातूरमधील प्रसिद्ध ‘आरसीसी’ (RCC) कोचिंग क्लासेसचे संचालक प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयने पुण्यातून ताब्यात घेत अटक केली आहे. सीबीआयच्या पथकाने गेल्या काही दिवसांपासून लावलेल्या तगाद्यानंतर अखेर मोटेगावकरांना बेड्या ठोकण्यात आल्या. सीबीआयने मोटेगावकरांच्या कुटुंबाला दिलेल्या माहितीनुसार, त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याखाली अटक करण्यात आली आहे.
प्रा. मोटेगावकर यांच्या अटकेपूर्वी सीबीआयने तपासाचे चक्र वेगाने फिरवले होते. गेल्या शुक्रवारी सीबीआयच्या पथकाने थेट लातूर गाठून मोटेगावकर यांची जवळपास नऊ तास कसून चौकशी केली होती. त्यानंतर काल (रविवार) सीबीआयच्या एका पथकाने लातूर शहरातील त्यांच्या कोचिंग क्लासच्या मुख्य कार्यालयावर धडक देत झाडाझडती घेतली आणि महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली.
लातूरमधील चौकशी संपवून मोटेगावकर पुण्यात आले असता, सीबीआयने काल पुण्यातही त्यांची चौकशी केली. अखेर आज तब्बल ११ तासांच्या मॅरेथॉन चौकशी आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे सीबीआयने त्यांना अधिकृतपणे अटक केली. आज सोमवारी ही बातमी लातूर आणि राज्यातील शैक्षणिक वर्तुळात धडकताच, लातूरच्या प्रसिद्ध ‘ट्युशन एरिया’मध्ये एकच खळबळ उडाली असून उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, NEET २०२६ च्या परीक्षेत कथित ‘गेस पेपर’ आणि मूळ पेपरमधील प्रश्न हुबेहूब जुळल्याचे समोर आल्यानंतर प्रा. मोटेगावकर सीबीआयच्या मुख्य रडारवर आले होते. मोटेगावकर यांनी परीक्षा घेणाऱ्या ‘एनटीए’ (NTA) शी संबंधित काही वरिष्ठ प्राध्यापक आणि अधिकाऱ्यांशी संधान साधले होते, अशी धक्कादायक माहिती तपासातून समोर येत आहे. या प्रकरणात आधीच नाव अडकलेले पी. व्ही. कुलकर्णी आणि मोटेगावकर यांचे अत्यंत घनिष्ठ संबंध असल्याचे सीबीआयच्या हाती लागलेल्या पुराव्यांवरून स्पष्ट झाले आहे.
मोटेगावकर यांनी परीक्षेपूर्वीच ‘नीट’चा मुख्य पेपर मिळवून तो उत्तरांसह आपल्या खास वर्तुळातील काही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर आहे. सीबीआयला मोटेगावकर यांच्या मोबाईलमध्ये पेपरफुटीचे अनेक भक्कम तांत्रिक पुरावे सापडले असून, सध्या त्यांच्या मोबाईलमधील डिलीट केलेला डेटा, व्हॉट्सॲप चॅट्स आणि कॉल रेकॉर्ड्स रिकव्हर करण्याचे काम फॉरेन्सिक टीमच्या मदतीने युद्धपातळीवर सुरू आहे.
१०० कोटींची उलाढाल, ‘डॉक्टर घडवणारी फॅक्टरी’ अडचणीत!
मूळच्या लातूरमधील ‘रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस’ (RCC) ची महाराष्ट्रात मोठी क्रेझ आहे. मोटेगावकर सरांच्या क्लासमधील विद्यार्थ्यांना ‘जेईई’ (JEE) आणि ‘नीट’ (NEET) परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळत असल्याने, पालकांमध्ये या क्लासची मोठी प्रतिष्ठा निर्माण झाली होती. अवाढव्य फी भरून लाखो पालक आपल्या पाल्यांना या क्लासमध्ये प्रवेश मिळवून देत असत. वार्षिक १०० कोटींच्या घरात उलाढाल असलेल्या या कोचिंग क्लासकडे राज्यात ‘डॉक्टर आणि इंजिनिअर घडवणारी फॅक्टरी’ म्हणून पाहिले जायचे. मात्र, आता थेट मुख्य संस्थापकालाच पेपरफुटीच्या गुन्ह्यात सीबीआयने अटक केल्याने, संपूर्ण ‘आरसीसी पॅटर्न’ आणि या संस्थेत शिकणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
प्रा. शिवराज मोटेगावकर हे मूळचे लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील एका छोट्या गावातील रहिवासी आहेत. अत्यंत गरीब आणि सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या मोटेगावकरांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना स्वतःचा खर्च भागवण्यासाठी ‘होम ट्युशन’ घेण्यास सुरुवात केली होती. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून (नांदेड) त्यांनी एम.एस्सी. (केमिस्ट्री) मध्ये गोल्ड मेडल पटकावले होते. त्यांच्या अधिकृत दाव्यानुसार, त्यांनी SET/NET-JRF, GATE, DRDO, BARC आणि TIFR सारख्या अत्यंत कठीण राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा उत्तीर्ण केल्या होत्या. उमरगा (जि. धाराशिव) आणि लातूरमधील महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर (CHB) प्राध्यापक म्हणून काम करता करता त्यांनी २००३ मध्ये ‘रेणुकाई कोचिंग क्लासेस’ची स्थापना केली होती.
‘ब्रँड आरसीसी’ आणि आक्रमक जाहिरातबाजीचा फुगा फुटला?
सुरुवातीला केवळ केमिस्ट्री विषयापुरता मर्यादित असलेला हा क्लास पुढे “सर्व विषय एकाच छताखाली” या संकल्पनेमुळे प्रचंड मोठा झाला. प्रा. मोटेगावकरांनी महाराष्ट्रात पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, सोलापूर, कोल्हापूर आणि अकोला अशा प्रमुख शहरांमध्ये ‘आरसीसी’चे मोठे जाळे विणले. विशेषतः कोरोना काळात त्यांनी डिजिटल आणि ऑनलाईन शिक्षण प्रणालीचा वापर करत आक्रमक जाहिरातबाजी केली. “आमच्या क्लासचे प्रश्न परीक्षेत जसेच्या तसे जुळतात,” असा दावा मोटेगावकर वारंवार छातीठोकपणे करायचे. पण हा दावा त्यांच्या अभ्यासाचा किंवा ‘गेस पेपर’चा नव्हता तर थेट ‘पेपरफुटीचा’ होता, हे आता सीबीआयच्या कारवाईनंतर समोर येत असल्याने संपूर्ण परीक्षा पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या प्रकरणाचे धागेदोरे दिल्ली ते गल्ली आणखी कुठे कुठे पोहोचले आहेत, याचा सखोल तपास आता सीबीआय करत आहे.