-६७ लाखांच्या पाणी योजनेचा बोजवारा; दोन वर्षांपासून टंचाई, प्रशासनाविरोधात संताप
देऊळगाव घुबे (राजेंद्र घुबे): चिखली तालुक्यातील मौजे मंगरूळ येथे भीषण पाणीटंचाईमुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी अखेर पंचायत समिती कार्यालय, चिखली समोर आमरण उपोषण सुरू केले आहे. ग्रामपंचायतीच्या नियोजनशून्य व निष्क्रिय कारभारामुळे गावकऱ्यांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
माहितीनुसार, मंगरूळ गावासाठी सन २०२१ मध्ये शासनाकडून सुमारे ६७ लाख रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत पाईपलाईन, विहीर आणि वीज कनेक्शन देण्यात येणार होते. मात्र निकृष्ट दर्जाचे काम आणि नियोजनाच्या अभावामुळे ग्रामस्थांना थेंबभरही पाणी मिळाले नसल्याची परिस्थिती आहे. ठेकेदार व ग्रामपंचायत प्रतिनिधी यांच्या संगनमतामुळे पाईपलाईन बुडीत क्षेत्रातून टाकण्यात आल्याने ती वारंवार लीक होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. परिणामी लाखो रुपये खर्चूनही योजना पूर्णपणे निष्प्रभ ठरली आहे.
यापूर्वीही ग्रामस्थांनी निवेदन देऊन ५ मेपासून उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र प्रशासनाने कोणतीही ठोस उपाययोजना न केल्याने अखेर ग्रामस्थांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला. गेल्या दोन वर्षांपासून पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या मंगरूळ गावात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, “शासनाचा पैसा पाण्यात गेला असून दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि मंगरूळवासीयांची तहान भागवावी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल,” असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.