– श्री नृसिंह जयंतीनिमित्त संजीवन समाधीवर आकर्षक देखावा; भाविकांची मोठी गर्दी
आळंदी (अर्जुन मेदनकर) येथील श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिरात श्री नृसिंह जयंतीनिमित्त श्री ज्ञानदेवांच्या संजीवन समाधीवर चंदन उटीद्वारे भगवान श्री नृसिंह अवतार आकर्षकपणे साकारण्यात आला. पुणे येथील मूर्तिकार अभिजीत धोंडफळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रमपूर्वक हा चंदन उटी अवतार साकारला.
या देखाव्याचे वैभवी दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. श्रद्धा आणि भक्तिभावाने भारलेल्या वातावरणात भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले.
श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज मठ येथे नृसिंह जयंतीनिमित्त श्रींच्या संजीवन स्थळी नृसिंह अवताराचे चंदन उटी साकारण्यात आले. श्रींचे पुजारी सुधीर गांधी आणि गांधी परिवाराच्या वतीने परिश्रमपूर्वक हा देखावा उभारण्यात आला.या आकर्षक चंदन उटी दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने मंदिरात उपस्थिती लावली. भक्तिमय वातावरणात भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले.