-भव्य मिरवणूक, निळ्या ध्वजांनी गाव दुमदुमले; भीम अनुयायांचा उत्स्फूर्त सहभाग
देऊळगाव घुबे, ता. चिखली (राजेंद्र घुबे) : येथे १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५वी जयंती जल्लोषात साजरी करण्यात आली. या निमित्त गावाच्या मुख्य रस्त्यावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यात शेकडो भीम अनुयायी सहभागी झाले होते. चौकाचौकात निळे ध्वज लावण्यात आल्याने संपूर्ण गावात भीमजयंतीचा उत्साह पाहायला मिळाला. मागील १० दिवसांपासून सर्वत्र जयंती साजरी करण्याची जय्यत तयारी सुरू होती. १३ एप्रिलच्या रात्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मोठ्या जल्लोषात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
या निमित्त ग्रामपंचायत कार्यालय, जानकीदेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी केंद्रामध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मानवंदना देऊन पूजन करण्यात आले. ठिकठिकाणी विविध कार्यक्रमही पार पडले. संध्याकाळी गावातून मुख्य रस्त्याने भव्य मिरवणुकीला प्रारंभ झाला. या मिरवणुकीत गावातील समस्त भीमसैनिक, ग्रामस्थ व तरुण युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. डीजेच्या तालावर विविध भीमगीतांवर ठेका धरत जल्लोष करण्यात आला. मिरवणुकीत मोठ्या संख्येने महिला, पुरुष तसेच मुले-मुली सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले.