-हरिनाम गजरात उत्सवाची सांगता; भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी
आळंदी (अर्जुन मेदनकर) : अलंकापुरीतील परंपरांचे पालन करत ग्रामदैवत श्री हजेरी मारुती मंदिरात हनुमान जन्मोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. हरिनामाच्या जयघोषात गावकरी भजन सेवेने या सोहळ्याची मंगलमय सांगता करण्यात आली.
जन्मोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये कीर्तनकार सोमनाथ महाराज भालेकर यांची सुश्राव्य कीर्तन सेवा पार पडली. पंचक्रोशीतील भाविक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून श्री मारुतीरायांचे दर्शन घेतले. हजारो भक्तांनी रांगा लावत श्रींचे दर्शन घेतले आणि श्रीफळ अर्पण करून पूजा केली. यावेळी भाविकांना दूध प्रसादाचे वाटप करण्यात आले. मंदिरात आकर्षक फुलांची सजावट तसेच विद्युत रोषणाईमुळे परिसर अत्यंत लक्षवेधी झाला होता. भक्तिमय वातावरणात आळंदीकर ग्रामस्थ आणि गावकरी भजनी मंडळाच्या वतीने भजन सेवा सादर करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत हरिनाम गजर सुरू राहून उत्सवाची सांगता झाली. या उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी नवशिवशक्ती तरुण मंडळाने भाविकांसाठी सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रम सुरळीत पार पडला.
यावेळी आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, पोलीस नाईक मच्छिंद्र शेंडे, शांतता समिती सदस्य डी.डी. भोसले पाटील, वारकरी साधक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कीर्तनकार सोमनाथ महाराज भालेकर यांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच पंडितराव रानवडे, कांताराम घुंडरे पाटील, रामदास महाराज उभे, नागनाथ अण्णा कांबळे, गव्हाणे महाराज, सुरेश दळवी, शिवाजी कारेकर गुरुजी, विशाल रानवडे, शाळीग्राम घाटोळ, सुधाकर जंगले, माउली घुंडरे पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी भजन सेवा देत उत्सवात सहभाग घेतला.