या शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी बुलढाण्याचे उपविभागीय अधिकारी शरद पाटील, निवडणूक उपजिल्हाधिकारी श्रीमती सुहासिनी गोणेवार, तहसीलदार विजय सवडे, गट विकास अधिकारी वाघ तसेच तालुका कृषी अधिकारी अशोक सुरडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
महसूल व इतर विभागांच्या कामांचा आढावा
मंडळ अधिकारी संजय चौधरी यांनी प्रास्ताविकातून मंडळातील विविध कामांचा आढावा सादर केला. या मोहिमेअंतर्गत महसूल विभागाकडून ६० फेरफार निकाली काढण्यात आले, तर १०३ सातबारा आणि १८४ ‘८-अ’ उताऱ्यांचे वाटप करण्यात आले. तसेच नैसर्गिक आपत्ती मदत वाटपाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. सेतू व संजय गांधी निराधार योजनेंतर्गत २७३ विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले, तर ११ लाभार्थ्यांना नवीन मंजुरी आदेश देण्यात आले. आरोग्य विभागामार्फत ११० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच ५ आयुष्मान कार्डचे वाटप करण्यात आले. कृषी विभागाकडून २८ लाभार्थ्यांच्या पीएम किसान व इतर अडचणींचे निवारण करण्यात आले. ‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी’ योजनेअंतर्गत ६ लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
पुरवठा विभागामार्फत १० रेशन कार्ड दुरुस्त करण्यात आली, तर अंगणवाडी विभागाकडून ३ पोषण किटचे वाटप करण्यात आले.
मान्यवरांचे मार्गदर्शन
उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांनी जमिनीच्या वारस नोंदी, तुकडेबंदी तसेच अकृषिक (NA) जमिनींसंदर्भातील नवीन नियमांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तहसीलदार विजय सवडे यांनी ‘AgriStack’ तसेच अकृषिक परवानगीसाठी अर्ज करण्याची सुलभ पद्धत नागरिकांना समजावून सांगितली. उपजिल्हाधिकारी सुहासिनी गोणेवार यांनी मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रमात नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले.
जनजागृती व सहभाग
शिबिरादरम्यान सरस्वती नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आरोग्य जनजागृतीसाठी पथनाट्य सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले. भाजप युवा आघाडी अध्यक्ष संतोष काळे तसेच युवा सेना अध्यक्ष नंदुभाऊ कऱ्हाडे यांनी स्थानिक प्रशासनाच्या कामाचे कौतुक करत जनसामान्यांचे प्रश्न मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्राम महसूल अधिकारी सुनील डव्हळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन संजय डुकरे यांनी केले. या शिबिराच्या यशस्वितेसाठी चांधई मंडळातील सर्व ग्राम महसूल अधिकारी, कर्मचारी तसेच ग्रामपंचायत प्रशासनाने विशेष परिश्रम घेतले.