-दोन वर्षांच्या कार्यकाळात उत्कृष्ट कामगिरी; मनोज मोरे यांनी ग्रामपंचायत अधिकाऱ्याचा पदभार स्वीकारला
साखरखेर्डा (अशोक इंगळे) : गेल्या दोन वर्षांपासून साखरखेर्डा ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायत अधिकारी म्हणून उत्कृष्ट कामगिरी करत सर्वसामान्य नागरिकांच्या कामांसाठी तत्परतेने कार्य करणारे ज्ञानेश्वर चनखोरे यांची पदोन्नती होऊन त्यांची लोणार पंचायत समिती येथे विस्तार अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
साखरखेर्डा ग्रामपंचायत ही सुमारे २५ हजार लोकसंख्या असलेली मोठी ग्रामपंचायत असून येथे १७ सदस्य आहेत, त्यापैकी ९ महिला सदस्य आहेत. सध्या साखरखेर्डा गाव नगर पंचायत होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. एवढ्या मोठ्या ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळताना ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. गेल्या दोन वर्षांत ज्ञानेश्वर चनखोरे यांनी विविध चांगले-वाईट अनुभव घेत गावाच्या विकासासाठी सामंजस्याची भूमिका ठेवत कामे केली आणि नागरिकांचा विश्वास संपादन केला. २६ जानेवारी रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी काही ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना पदोन्नतीसाठी पात्र ठरवले होते. त्यामध्ये चनखोरे यांचे नाव अग्रक्रमावर होते. दोन दिवसांपूर्वी त्यांची लोणार पंचायत समिती येथे विस्तार अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनी आपला पदभार मनोज मोरे यांच्याकडे सुपूर्द केला.
दरम्यान, मनोज मोरे यांच्या कारकिर्दीचा मोठा कालावधी साखरखेर्डा येथेच गेला आहे. यापूर्वी ते सुमारे १५ वर्षे येथे ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यानंतर पुन्हा त्यांची ग्रामपंचायत अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. गावाचा सखोल अभ्यास असल्याने त्यांनी सर्वांना विश्वासात घेऊन काम करावे लागणार आहे. याआधी ते गोरेगाव येथे कार्यरत होते. काही नागरिकांनी त्यांच्या कामकाजात अनियमितता झाल्याचा आरोप केल्यानंतर त्यांनी त्या पदाचा राजीनामा देऊन कार्यमुक्त झाले होते. साखरखेर्डा येथे ग्रामपंचायत अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती व्हावी अशी मागणी काही नागरिकांनी केली होती. ग्रामपंचायत अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारण्यास कोणी पुढे येत नसल्याने पंचायत समितीसमोर मनोज मोरे हा एकमेव पर्याय उरला होता. आज त्यांनी अधिकृतपणे पदभार स्वीकारला आहे.