-चिंचोली बुरकुल येथे ‘महाराजस्व समाधान शिबिरा’त लाभार्थ्यांची गर्दी
देऊळगाव राजा (सुरेश हुसे) : सामान्य नागरिकांच्या शासकीय अडचणींना वेगाने व प्रभावीरीत्या मार्गी लावण्यासाठी मौजे चिंचोली बुरकुल येथे शनिवारी (१४ फेब्रुवारी) ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरा’चे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात पार पडलेल्या या शिबिरात महसूल, आरोग्य, ग्रामपंचायत, कृषी, महिला व बालविकास विभागांसह विविध शासकीय यंत्रणा थेट नागरिकांच्या सेवेत उतरल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण होते.
या लोकाभिमुख उपक्रमाचे अध्यक्षपद माजी सरपंच केशव बुरकुल यांनी भूषवले. ग्राम महसूल अधिकारी गजानन टेकाळे यांनी शिबिरामागील उद्देश स्पष्ट करत नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. मंडळाधिकारी विनोद डोईफोडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तुळजापूर मंडळातील विविध गावांचे सरपंच व्यासपीठावर उपस्थित होते.
शिबिरात आयुष्मान भारत कार्ड वितरण, ‘जिवंत ७/१२’ मोहिमेंतर्गत सातबारा उतारे, फेरफार नक्कल, उत्पन्न दाखले, महा ई-सेवा केंद्रांतर्गत विविध प्रमाणपत्रे तसेच ई-शिधापत्रिका सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. श्रावणबाळ योजना व संजय गांधी निराधार योजनेचे मंजुरी आदेशही वितरित करण्यात आले. मतदार यादीत नाव नोंदणी अर्ज स्वीकारण्यात आले, तर कृषी विभागाकडून ‘महाविस्तार ॲप’ची माहिती देण्यात आली. शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणीही करण्यात आली. राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन योजना तसेच महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड अर्ज स्वीकृत करण्यात आले. अनेक नागरिकांच्या प्रलंबित समस्या जागेवरच निकाली निघाल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेचे नागरिकांनी कौतुक केले.
हा उपक्रम जिल्हाधिकारी किरण पाटील, उपविभागीय अधिकारी संजय खडसे तसेच तहसीलदार वैशाली डोंगराळ यांच्या मार्गदर्शनाखाली शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्राम महसूल अधिकारी गजानन टेकाळे, संजय बरांडे, सुमीत जाधव, परसराम सोळंकी, बबनराव काकड, ग्रामपंचायत अधिकारी सुश्मा चेके तसेच कृषी सहायक कोठोडे यांनी विशेष परिश्रम घेतले. अध्यक्ष केशव बुरकुल यांनी नागरिकांनी शासनाच्या योजनांचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहन केले. सूत्रसंचालन सुमीत जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन परसराम सोळंकी यांनी मानले.