-नागरिकांच्या तक्रारींवर जागेवरच न्याय — कामचुकार कर्मचाऱ्यांची झाडाझडती
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) : रेशन कार्डच्या नावनोंदणीपासून धान्य वितरणापर्यंत सुरू असलेल्या गैरकारभाराच्या तक्रारी सातत्याने वाढत असताना अखेर तहसीलदार अजित दिवटे यांनी पुरवठा विभागावर थेट कारवाईचा बडगा उगारला. मंगळवार दि. १० फेब्रुवारी रोजी कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांनी पुरवठा कार्यालयात अचानक धडक देत ढिसाळ आणि बेजबाबदार कारभाराची अक्षरशः पोलखोल केली. त्यांच्या या अनपेक्षित भेटीमुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली.
गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांना रेशन कार्डमध्ये नाव वाढवणे, नाव कमी करणे, नवीन रेशन कार्ड मिळवणे यासाठी वारंवार कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत होत्या. धान्य वितरणातही तक्रारींचा अक्षरशः पाढा वाचला जात होता. या पार्श्वभूमीवर तहसीलदार अजित दिवटे यांनी स्वतः परिस्थितीची पाहणी करण्याचा निर्णय घेतला. कार्यालयात दाखल होताच त्यांनी प्रलंबित अर्जांच्या फाईली तपासण्यास सुरुवात केली असता अनेक अर्ज महिनोन्महिने तसेच पडून असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. यावेळी तहसीलदारांनी वृद्ध, महिला व गरिब नागरिकांच्या व्यथा थेट ऐकून घेतल्या. कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची त्यांनी जागेवरच झाडाझडती घेत कडक शब्दांत कानउघडणी केली. जनतेच्या कामात अडथळा आणणाऱ्यांना शिस्तभंगाची अंतिम चेतावणी देत, वेळेत काम न झाल्यास थेट कारवाई केली जाईल, असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले.
या ‘ऑन द स्पॉट’ कारवाईनंतर अनेक नागरिकांची वर्षानुवर्षे रखडलेली कामे अवघ्या काही तासांत पूर्ण झाली. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे त्रस्त असलेल्या सामान्य नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला. एका संतप्त नागरिकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, “पुरवठा कार्यालयात कोणीच आमचे ऐकत नव्हते. आज साहेब आले आणि आमचे काम क्षणात झाले.” यासंदर्भात तहसीलदार अजित दिवटे यांनी ब्रेकिंग महाराष्ट्र शी बोलताना ठाम शब्दांत इशारा दिला. “रेशन विभाग म्हणजे दलालांचा अड्डा नाही. जनतेच्या कामात अडथळा आणणाऱ्यांवर आता थेट कारवाई होईल. पारदर्शकता नसेल तर कोणालाही माफी नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. या अचानक धडक कारवाईमुळे रेशन विभागातील सडलेला कारभार हादरून गेला असून, पुढील काळात आणखी कठोर पावले उचलली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.