-३० हजार वार्षिक हप्त्याची मागणी; १५ हजार स्वीकारताना कनिष्ठ लिपिक रंगेहात जेरबंद
-सहायक वनसंरक्षक अश्विनी आपेट व लिपिक अमोल मोरे यांच्यावर एसीबीची धडक कारवाई
बुलढाणा (सुरेश हुसे) : वनविभागातील भ्रष्टाचाराचा आणखी एक घृणास्पद प्रकार उघडकीस आला असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बुलढाणा युनिटने केलेल्या सापळा कारवाईत सहायक वनसंरक्षक व त्यांच्या कार्यालयातील कनिष्ठ लिपिकाचा लाचखोरीचा काळा चेहरा उघडा पडला आहे. झाडतोड, वाहतूक व लाकूड विक्रीचा व्यवसाय सुरळीत सुरू ठेवण्यासाठी तब्बल ३० हजार रुपयांच्या वार्षिक हप्त्याची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणी श्रीमती अश्विनी वसंत आपेट (वय ३५), सहायक वनसंरक्षक, वर्ग–१ आणि श्री. अमोल वसंत मोरे (वय ३८), कनिष्ठ लिपिक, वर्ग–३, दोघेही सहायक वनसंरक्षक कार्यालय, वनविभाग, बुलढाणा येथे कार्यरत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
तडजोडीअंती १५ हजारांचा पहिला हप्ता!
तक्रारदार हे शेतातील झाडांची खरेदी करून त्यांची कटाई, वाहतूक व लाकूड विक्रीचा व्यवसाय करतात. या व्यवसायावर कोणतीही कारवाई न करता ‘आशीर्वाद’ देण्यासाठी आरोपी लोकसेविका व त्यांच्या कारकून यांनी ३० हजार रुपये वार्षिक लाचेची मागणी केल्याची तक्रार अँटी करप्शन ब्युरो, बुलढाणा घटकाकडे प्राप्त झाली होती.
त्यानुसार दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. पडताळणीदरम्यान आरोपी सहायक वनसंरक्षक आपेट यांनी १५ हजार रुपये पहिला हप्ता स्वीकारण्यास संमती दिल्याने बुलढाणा येथील सहायक वनसंरक्षक कार्यालयात सापळा रचण्यात आला.
कार्यालयातच रंगेहात अटक!
सापळा कार्यवाहीदरम्यान आरोपी क्र. ०२ अमोल मोरे यांना आरोपी क्र. ०१ अश्विनी आपेट यांच्या समक्ष त्यांच्या दालनातच तक्रारदाराकडून १५ हजार रुपये लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईने वनविभागात एकच खळबळ उडाली आहे.
भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल
या प्रकरणी दोन्ही आरोपींविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात येत आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही सापळा कार्यवाही
मा. बापू बांगर, पोलीस अधीक्षक, एसीबी अमरावती परिक्षेत्र,
मा. सचिंद्र शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक,
मा. भागोजी चोरमले, पोलीस उपअधीक्षक, एसीबी बुलढाणा
यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
लाच मागितली तर तक्रार करा!
शासकीय लोकसेवकाने लाच मागितल्यास नागरिकांनी निर्भयपणे
अँटी करप्शन ब्युरो, बुलढाणा
☎ फोन : 07262-242548
📱 व्हॉट्सॲप : 9405091064
📞 टोल फ्री : 1064
या क्रमांकांवर तक्रार करावी, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक, एसीबी बुलढाणा यांनी केले आहे.