– समाजाच्या नेत्यासाठी ब्राम्हण महासंघाचे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांना पत्र
पुणे (ब्रेकिंग महाराष्ट्र) – भारतीय जनता पक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर सक्षम नेतृत्व प्रदान करण्यात जी दोन ते तीन नावे समोर येतात, त्यात देवेंद्र फडणवीस यांचे नाव अग्रस्थानी आहे. एक महिन्यापूर्वी ज्याप्रकारे त्यांना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पद घेण्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी तयार केले. त्यामुळे त्यांच्या करिष्माला काही प्रमाणात धक्का लागला. परंतु केंद्रीय संसदीय समितीत त्यांची निवड करुन त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामुळे राष्ट्रीय स्तरावर फडणवीस यांचे काम सुरू होत आहे. प्रसारमाध्यमातून भाजपचे वरिष्ठ नेते फडणवीस यांच्याकरिता आगामी लोकसभा निवडणुकीत सुरक्षित मतदारसंघ शोधत असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. फडणवीस यांनी पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढवावी, आम्ही त्यांना विजयी करू, असे आश्वासन ब्राम्हण महासंघाने देत, फडणवीस हे मोदींना सक्षम पर्याय असल्याचेदेखील अपरोक्षरित्या सूचित केले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ब्राम्हण समाजातून आलेले नेतृत्व आहे. त्याच्या पाठीमागे ब्राम्हण समाज खंबीरपणे उभा राहिल्याचे अलिकडे दिसून आले आहे. फडणवीस यांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी द्यावी, अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने केली असून, ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना याबाबत पत्र लिहिले आहे. त्यात हे साकडे घातले आहे. याबाबत गोविंद कुलकर्णी म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे हुशार राजकीय व्यक्तिमत्व असून, त्यांनी यापूर्वी सलग पाच वर्षे राज्याचे मुख्यमंत्री पद भूषवले आहे. राज्यातील जनतेचे कल्याण व्हावे, याकरिता त्यांनी अथक प्रयत्न केले असून, भाजपचे ते भविष्य आहेत. पुणे हा अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचा गड असून, २००६ मध्ये आम्ही काँग्रेसचे सुरेश कलमाडी, २०१४ मध्ये भाजपचे अनिल शिरोळे, २०१९ मध्ये गिरीष बापट यांच्यासोबत उभे राहिलो. त्याचा परिणाम समोर आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी पुणे हा सुरक्षित मतदारसंघ आहे. फडणवीस यांनी या मतदारसंघातून नामांकन भरले, तर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ त्यांना विजयी करण्यासाठी काम करेल, असे आश्वासनही कुलकर्णी यांनी ब्राम्हण समाजाच्यावतीने भाजपच्या अध्यक्षांना दिले आहे.
देवेंद्र फडणवीस हे ब्राम्हण समाजाचे असून, फडणवीस यांच्यासाठी त्यांचा समाज खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभा असल्याचे यानिमित्ताने दिसून आले आहे. राज्यातील बहुजन समाजाने यापासून आदर्श घेण्याची गरज असून, बहुजनांनीदेखील आपल्या समाजाच्या नेतृत्वाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे.