-पंचक्रोशीला मार्गदर्शन करणारा आधारस्तंभ हरपला
-सहकार महर्षी स्व .भास्करराव शिंगणे यांचे खंदे समर्थक
साखरखेर्डा ( अशोक इंगळे ) – साखरखेर्डा पंचक्रोशीतील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील एक मान्यवर व्यक्तिमत्त्व म्हणून तब्बल पाच दशके ‘सावकार’ म्हणून नावाजलेले माजी पंचायत समिती सदस्य आणि माजी सरपंच माधवराव पुंडलिक तुपकर पाटील (सावकार) यांचे वयाच्या ८३व्या वर्षी निधन झाले.
माधवराव तुपकर हे एक जमीनदार आणि कापूस उत्पादक शेतकरी म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात १९६५ ते १९७० या काळात सरपंच म्हणून झाली. त्यानंतर १९७५ ते १९८० या कालावधीत ते पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आले. सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले. पंचक्रोशीत त्यांनी दिलेला शब्द पाळला जायचा, म्हणूनच ते लोकांच्या मनात विशेष स्थान मिळवून होते. सहकार महर्षी स्व. भास्करराव शिंगणे यांचे ते विश्वासू सहकारी होते. शिंगणे साहेब या भागाची जबाबदारी निश्चिंतपणे त्यांच्या हाती देत असत. लहान–मोठा असा भेद न ठेवता प्रत्येकाशी त्यांनी मित्रत्वाने संबंध जोपासले. भास्करराव शिंगणे यांच्या निधनानंतरही त्यांनी माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांना सर्वोतोपरी सहकार्याची भूमिका पुढे चालू ठेवली. काही दिवसांपूर्वीच डॉ. शिंगणे यांनी त्यांच्या घरी जाऊन तब्येतीची विचारपूस केली होती. माधवराव तुपकर यांच्या आयुष्यातील मोठा आघात म्हणजे मुलगा स्व. संतोष माधवराव तुपकर यांचे अपघाती निधन. या दुःखातून सावरत त्यांनी नातू अमोल आणि विकी यांच्या उच्च शिक्षणाची जबाबदारी स्वतः उचलली. संतोष यांच्या निधनानंतर दुसरा मुलगा सुनील यांनी कुटुंबाचा संपूर्ण भार खांद्यावर घेत घर व्यवस्थित सांभाळले. त्यांना तीन मुली आहेत —अंत्रीखेडेकर येथील मीनाबाई शेषराव खेडेकर, चिखलीतील राजकीय घराण्यातील मंगला आत्माराम बाहेकर, आणि डोंगरखंडाळा येथील सविता अशोक सावळे. माधवराव तुपकर यांच्या निधनाने साखरखेर्डा आणि पंचक्रोशीतील नागरिकांत हळहळ व्यक्त होत असून अनेकांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.