– देऊळगाव घुबे ते शेळगाव आटोळ रस्त्याचे रूंदीकरणासह डांबरीकरण, इसरूळ ते बायगाव रस्त्याच्या डांबरीकरणाचे बंद पडलेले काम सुरू करण्यासाठी डॉ. विकास मिसाळ पुन्हा आक्रमक!
– सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याला निवेदन; काम पूर्ण न केल्यास दिला अन्नत्याग आंदोलनाचा इशारा!
देऊळगाव घुबे (राजेंद्र घुबे) – देऊळगाव धुबे ते शेळगाव आटोळ रस्ता रुंदीकरणासह डांबरीकरण करणे आणि इसरुळ ते बायगाव रस्ता डांबरीकरण करण्याचे बंद पडलेले काम तात्काळ सुरू करावे, अन्यथा दि.२४ नोव्हेंबरपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉ. विकास मिसाळ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे. विशेष म्हणजे, या रस्त्याच्या कामासाठी डॉ. विकास मिसाळ हे वारंवार आक्रमक भूमिका घेत असून, त्यांच्या आंदोलनामुळेच हा रस्ता प्रश्न मार्गी लागत आला आहे. परंतु, रूंदीकरणासह डांबरीकरणाचे काम रखडले असून, त्यामुळे ते पुन्हा एकदा आक्रमक झाले असून, निवेदन देतेप्रसंगी त्यांच्यासोबत इसरूळचे सरपंच तथा तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष सतिश पाटील भुतेकर, मिसाळवाडीचे सरपंच विनोद (बाळू) पाटील यांचीही उपस्थिती होती.
या निवेदनात नमूद आहे, की देऊळगाव धुबे ते शेळगाव आटोळ रस्ता रुंदीकरणासह डांबरीकरणाचे कामाचा कार्यारंभ आदेश देऊन खूप महिने झाले. काम करण्याची मुदतसुद्धा संपलेली आहे. तरीसुद्धा अद्यापपर्यंत डांबरीकरण तर सोडाच, परंतु रुंदीकरणाचेसुद्धा काम पूर्ण करण्यात आलेले नाही. म्हणजेच एकूण कामाच्या १० टक्के कामसुद्धा करण्यात आलेले नाही. हा रस्ता अतिशय खराब झालेला असल्यामुळे वाहनधारकांना तसेच रस्त्यालगतचे शेतकरी आणि रहिवासी यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. धुळीमुळे शेतकर्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच इसरुळ ते बायगाव रस्ता डांबरीकरणाचे कामासंदर्भात दिनांक १७/२/२०२५ रोजी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनस्थळी माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आणि आपल्या उपस्थितीत उपविभागीय अभियंता उपविभाग देऊळगावराजा यांनी २५/२/२०२५ पासून काम सुरु करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले होते. तरीपण अद्यापपर्यंत या कामाला सुरुवात करण्यात आली नाही, ही आंदोलनकर्ते आणि जनतेची एक प्रकारे फसवणूकच आहे. तेव्हा, देऊळगाव घुबे ते शेळगाव आटोळ रस्ता आणि इसरुळ ते बायगांव रस्ता डांबरीकरणाचे काम तात्काळ सुरु करण्यात यावे, अन्यथा अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशाराही डॉ. विकास मिसाळ यांनी दिला आहे.
या रस्ताकामाचे रूंदीकरण व डांबरीकरणाचे काम तातडीने सुरू न झाल्यास देऊळगाव घुबे ते शेळगाव आटोळ रस्त्यावर मिसाळवाडी फाट्याजवळ सार्वजानिक बांधकाम विभागाच्या हद्दीत दिनांक २४ नोव्हेंबरपासून अन्नत्याग आंदोलन सुरु करण्यात येईल, आणि यामुळे होणार्या परिणामांची तसेच धुळीमुळे रस्त्यालगतच्या शेतातील पिकांचे होत असलेल्या नुकसानीची संपूर्ण जबाबदारी सार्वजानिक बांधकाम विभाग बुलढाणा यांची राहील, असा इशाराही डॉ. विकास मिसाळ यांनी दिला आहे. या निवेदनावर, डॉ. विकास मिसाळ यांच्यासह इसरूळचे सरपंच सतिश पाटील भुतेकर, मिसाळवाडीचे सरपंच विनोद तथा बाळू पाटील, शेळगाव आटोळचे उपसरपंच संतोष बोर्डे आदींच्या सह्या आहेत.
——————