– आठवडी बाजारात धावपळ!
साखरखेर्डा (अशोक इंगळे) – साखरखेर्डा मंडळात १५ ऑगस्टरोजी सायंकाळी तब्बल एक तास मुसळधार पाऊस पडल्याने नदी, नाल्यांना पूर आल्याने शेतात पाणीच पाणी चहूकडे पसरले होते. वीज पडून एक बैल ठार झाला आहे, सतत पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. काल, दि.१५ ऑगस्टरोजी सायंकाळी पाच वाजता आभाळ दाटून आले होते. विजांच्या कडकडाटात धुव्वाधार पावसाला सुरुवात झाली. पावसाचा एवढा वेग होता, की भोगावती नदीजवळील महादेव मंदीराला पाण्याचा वेढा पडला होता.
काल, शुक्रवार असल्याने आठवडी बाजार गजबजलेला होता. पाळ्याचा बाजार असल्याने दुकाने सजली होती. दुपारी बाजारात जशी गर्दी वाढली तसा पावसाने चांगलीच हजेरी लावली. किरकोळ व्यापारी, भाजी विक्रेते, बाजार करणारे ग्राहक यांच्यात एकच तारांबळ उडाली. जो तो आपापल्या परीने आसरा शोधत होता. ९ ऑगस्टला झालेल्या अतिवृष्टीमुळे शेकडो शेतकर्यांचे नुकसान झाले होते. कालच्या पावसाने तर दाणादाण उडविली होती. साखरखेर्डा येथील शिवानंद बाळाजी आदबने यांच्या गट नंबर ६१५ मधील शेतात वीज पडल्याने बैल मृत पावला असून, आज सकाळी पटवारी प्रशांत पोंधे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तर पशुवैद्यकीय अधिकारी यांनी उत्तरीय तपासणी केली. साखरखेर्डा, शिंदी, तांदुळवाडा, मेरा बु, अंत्रीखेडेकर, दरेगाव, हनवतखे, हिवरा गडलिंग, गुंज, गोरेगाव, उमनगाव, बाळसमुंद्र या भागात अतिवृष्टीसदृश पाऊस पडल्याने शेतीपिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. साखरखेर्डा शिवपासून शेंदुर्जन मंडळ सुरु होत असल्याने साखरखेर्डापासून तीन किलोमीटर मी अंतरावर असलेल्या आणि अतिवृष्टीचा फटका बसलेल्या गोरेगाव, बाळसमुद्र, उमनगाव, तांदुळवाडी, काटेपांग्री या गावाला कवडीचीही मदत मिळत नाही. या गावांचा सर्वे कोणीही केला नाही, त्यामुळे या पाच गावांचा समावेश अतिवृष्टीमध्ये करून शासनाने मदत द्यावी, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.
सवडद ते गजरखेड पूल वाहिला!
सवडद ते गजरखेड हा रस्ता पाटबंधारे विभागाकडे असून, या रस्त्यावरील सवडदजवळील कोराडी नदीवरील पूल वाहून गेला आह. कोराडी धरणाचे पाणी सवडद गावापर्यंत येत असल्याने पाणी पुलाच्या मागे ५ हजार मीटरपर्यंत पसरलेले असते. काल हा पुलंचं पुरामुळे वाहून गेला असल्याने सवडद येथील शेतकर्यांना शेतात जाण्यासाठी रस्ताच राहिला नाही. सवडद येथील शेकडो हेक्टर शेतजमीन नदीच्या पलीकडे आहे. आज त्या शेतकर्यांना शेतात जाण्यासाठी रस्ताच राहिला आहे. त्यामुळे पाले, भाजी घेणार्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. त्या भागातील शेतकर्यांना लव्हाळा येथून गजरखेड मार्ग असा १५ किलोमीटर अंतरावरचा फेरफटका मारावा लागतो. तरी या पुलाचे काम तत्काळ करावे, अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तेजराव देशमुख यांनी केली आहे. शिंदी येथील रस्त्याने वाहणारे पाणी नागरिकांच्या घरात घुसून सामानाची नासाडी झाली आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरले, भिंती पडल्या असून, गावाच्या मधोमध पुराच्या पाण्यामुळे दरी पडली आहे.