– फुफ्फुसाजवळचा ट्युमर काढून रूग्णाला दिला मोकळा श्वास!
वर्धा (प्रकाश कथले) – उजव्या फुफ्फुसाजवळ वाढलेला सुमारे २४ बाय १६ सेंटीमीटर आकाराचा आणि ४ किलो वजनाचा ट्युमर शस्त्रक्रियेद्वारे शरीरातून विलग करीत, एका ५८ वर्षीय पुरुष रुग्णाला जीवघेण्या व्याधीतून मुक्त करीत, मोकळा श्वास घेण्याचा आनंद सावंगी रुग्णालयाच्या शालिनीताई मेघे सुपरस्पेशालिटी सेंटरला झालेल्या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे प्राप्त झाला.
वर्धा जिल्ह्यातीलच रहिवासी असलेल्या या रुग्णाला गेल्या काही महिन्यांपासून थोड्याफार परिश्रमाने दम लागणे, थकवा येणे तसेच छातीवर दडपण आल्यासारखे जाणवत होते. रुग्णाने सुरुवातीला यालक्षणांकडे दुर्लक्ष केले. मात्र, त्रास वाढायला लागल्यावर तपासणीसाठी सदर रुग्णास आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या रुग्णालयाच्या शालिनीताई मेघे सुपर स्पेशालिटी सेंटरमधील सीव्हीटीएस म्हणजेच हृदय व रक्तवाहिन्यासंबंधित तसेच छातीची शस्त्रक्रिया करणार्या विभागात रुग्णाची संपूर्ण तपासणी करण्यात आली. तपासणीत रुग्णाच्या फुफ्फुसाच्या उजव्या बाजूला रक्तयुक्त फुफ्फुस झिल्लीमध्ये द्रव साठवण होऊन एक मोठा गोळा वाढल्याचे निदान झाले. सुमारे २४ सेमी लांब, १६ सेमी रूंद आणि मध्यभागी ११ सेमी जाडी असलेला हा गोळा हृदयाच्या वरच्या व खालच्या रक्तवाहिन्यांना, फुफ्फुसाची प्ल्युरा म्हणजे झिल्लीला, डायाप्रâाम म्हणजे मांसल श्वासपटलाला तसेच पाठीच्या कण्याच्या मागील भागाला चिकटून होता. शरीराची आतील बाजू मोठ्या प्रमाणात या ट्युमरने व्यापली असल्यामुळे रुग्णास श्वास घेणे त्रासदायक झाले होते. शरीरातून ट्युमर विलग करण्याची ही शस्त्रक्रिया केवळ जटिलच नव्हती, तर रुग्णाच्या जीवितासाठीही अत्यंत धोकादायक ठरणारी होती. मात्र, सीव्हीटीएस विभाग प्रमुख व तज्ज्ञ शल्यचिकित्सक डॉ. विवेक लांजे यांनी भूलतज्ज्ञ डॉ. भक्ती पाटील यांच्या सहकार्याने ही शस्त्रक्रिया अत्यंत कौशल्याने पूर्णत्वाला नेली. या शस्त्रक्रियेत रतेश थॉमस, अश्विनी जगताप, अमोल बालपांडे, अर्चना, लिंझ थॉमस या तंत्रज्ञ व परिचारकांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले. नवतंत्रज्ञान व कुशल हातांमुळे यश मिळाल्याचे डॉ. विवेक लांजे यांनी सांगितले.