– माजी आमदार सानंदांनी ‘घड्याळ’ बांधण्याआधीच पक्षसंघटनेत फेरबदल!
– खामगाव विधानसभा समन्वयकपदी ज्ञानेश्वर पाटील, तालुका अध्यक्षपदी तेजेंद्रसिंह चव्हाण तर शहराध्यक्षपदी स्वप्निल ठाकरे यांची नियुक्ती
बुलढाणा (बाळू वानखेडे) – खामगावचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी काँग्रेसचा राजीनामा देताच, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ चांगलेच ‘अॅक्शन मोड’वर आल्याचे दिसून येत आहे. आज, दि.५ मे रोजी तातडीने खामगाव विधानसभा मतदारसंघातील पक्ष संघटनेत मोठे फेरबदल केल्याचे दिसून येत असून, त्यामध्ये खामगाव विधानसभा समन्वयकपदी ज्ञानेश्वरदादा पाटील, खामगाव तालुकाध्यक्षपदी तेजेंद्रसिंह चव्हाण तर खामगाव शहराध्यक्षपदी स्वप्निल ठाकरे यांची नियुक्ती केली आहे. पक्षाचे खामगाव तालुक्यातील ‘डॅमेज कंट्रोल’ करण्यासाठी काँग्रेसने जोरदार तयारी केली आहे. तसेच, शेगाव तालुका ग्रामीण काँग्रेस अध्यक्षपदी ज्ञानेश्वर शेजोळे तर शेगाव शहराध्यक्षपदी कैलास देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
खामगाव विधानसभेचे तीन टर्म आमदार राहिलेले दिलीपकुमार सानंदा यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून, ते येत्या १२ जूनरोजी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होण्याआधीच प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ चांगलेच अॅक्शन मोडवर आल्याचे दिसून येत असून, त्यांनी काल, दि. ४ जूनरोजी मुंबईत राज्यातील काही तालुका व शहराध्यक्षपदासाठी मुलाखती घेतल्या. आज, दि. ५ जूनरोजी तातडीने खामगाव विधानसभा समन्वयकपदी ज्ञानेश्वरदादा पाटील, खामगाव ग्रामीण तालुका अध्यक्षपदी तेजेंद्रसिंह चव्हाण तर खामगाव शहराध्यक्षपदी स्वप्निल संजय ठाकरे यांची नियुक्ती केली आहे. सदर नियुक्ती बाबतचे पत्र उपाध्यक्ष गणेश पाटील यांच्या सहीने निर्गमित करण्यात आले आहे. यातील ज्ञानेश्वरदादा पाटील यांनी सन २०१९ मध्ये खामगाव विधानसभेतून विधानसभा निवडणूक लढवली होती. यामध्ये त्यांचा फार थोड्या मतांनी पराभव झाला होता. तेजेंद्रसिंह चव्हाण हे प्रदेश सेवादलाचे कार्याध्यक्ष असून, ते माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांचे कट्टर राजकीय विरोधक समजले जातात. स्वप्निल ठाकरे हे माजी जिल्हा परिषद सदस्य स्वर्गीय संजय ठाकरे पाटील यांचे चिरंजीव आहेत. खामगाव विधानसभा मतदारसंघात आणखी काय राजकीय घडामोडी घडतात, याकडे मात्र जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. याचबरोबर मेहकर विधानसभा समन्वयकपदी देवानंद पवार, चिखली विधानसभा समन्वयकपदी डॉ.राजू गवई तर सिंदखेडराजा विधानसभा समन्वयकपदी अशोकराव पडघान यांची आज, दि.५ मेरोजी नियुक्ती करण्यात आली आहे.