– मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे ३१ मार्चरोजी बहुजन साहित्य संमेलन
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे ३१ मार्च २०२५ रोजी आयोजित बहुजन साहित्य संमेलनाचे उद्घाटन केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) तथा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते होणार असून, या संमेलनाचे निमंत्रण त्यांनी स्वीकारले आहे. संमेलनाला बहुजन समाजातील राज्यभरातील नामवंत साहित्यिक हजेरी लावणार आहेत.
बहुजन साहित्य संघ, चिखली, जिल्हा बुलढाणाच्यावतीने, मातृतीर्थ अर्थात मॉ जिजाऊ यांची माहेरनगरी सिंदखेडराजा येथे दि. ३१ मार्च २०२५ रोजी आयोजित राज्यस्तरीय सहाव्या बहुजन साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाची जबाबदारी केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी स्वीकारली असून, बहुजन साहित्य संघाचे अध्यक्ष, तथा ज्येष्ठ साहित्यिक, कवी, कलावंत डॉ. विजयकुमार कस्तुरे, उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक डॉ. बबनराव महामुने, सचिव डॉ. डी. व्ही. खरात, चिखली, सल्लागार तथा संपादक प्रा. भास्कर इंगळे, बुलढाणा आणि ग्रामीण भागातील मौजे बोरगाव काकडे, ता. चिखली येथील भावकवी म्हणून प्रसिद्ध असलेले सहसंघटक आयुष्मान अंकुश पडघान यांनी यासंबंधीचे निमंत्रणपत्र काल (दि.२८ फेब्रुवारी) ना. जाधव यांना बुलढाणा येथे दिले असून, त्यांनी ते स्वीकारले आहे.
बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयातील विशेष कक्षामध्ये या संदर्भात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्यासोबत बहुजन साहित्य संघाच्या पदाधिकार्यांची सविस्तर चर्चा झाली. ना. जाधव यांनीसुध्दा अत्यंत आनंदाने सदर निमंत्रणाचा स्वीकार करून सहर्ष मातृतीर्थावर संपन्न होत असलेल्या उपरोक्त बहुजन साहित्य संमेलनाच्या उदघाटनासाठी आवर्जून उपस्थित राहण्याचे आश्वासन दिले आहे.