– विविध राजकीय व सामाजिक संघटनांचे सिंदखेडराजा तहसीलदारांना निवेदन
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीने प्रसिद्ध इतिहास संशोधक प्रा. इंद्रजीत सावंत यांना फोनकरून घरात घुसून जीवे मारण्याची धमकी दिली, तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व राजमाता जिजाऊ मॉसाहेब यांच्याबद्दल अत्यंत वाईट व गलिच्छ वक्तव्ये करून महापुरूषांची बदनामी केली. तसेच संबंधित व्यक्तीने विकृत लेखक जेम्स लेन याने केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ मॉसाहेब यांच्याबद्दलच्या अत्यंत विकृत लिखाणाचे समर्थन करून तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे या प्रशांत कोरटकर याच्यावर गुन्हा दाखल करून, त्याला तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी सिंदखेडराजा तहसीलदार यांच्याकडे आज (दि.२८) निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबतच्या निवेदनात म्हटले आहे की, मराठा समाजाला शिवीगाळ करून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न प्रशांत कोरटकर याने केला आहे. तसेच, इतिहास संशोधक प्रा. इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे नाव घेऊन सदर व्यक्तीने ही वक्तव्ये केली व धमकी देत असल्याने हे प्रकरण संवेदनशील आहे. प्रशांत कोरटकर या व्यक्तीने संबंधित ऑडिओ कॉलमध्ये पुढील वक्तव्ये केली आहेत : १) ब्राह्मणांच्या शासनात तुम्ही काम करत आहे हे लक्षात ठेवा. २) बाजीप्रभू नसते तर तुमचा महाराज जीवंत नसता. ३) तुमचे महाराज पळून गेले. ४) जेम्स लेनचे पुस्तक वाचा, लोकांना सांगा जेम्स लेनने काय म्हटले आहे, व्हू इज बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी, हे लोकांना सांगा. ५) ब्राह्मणांना कमी समजू नका, तुम्हाला ब्राह्मणांची ताकत दाखवतो, मग तुम्ही कितीही मराठे एकत्र करा. ६) छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचवणारा भालजी पेंढारकर हा ब्राह्मण होता, नाहीतर तुमचा छत्रपती कुठे गेला असता माहीत पडलं नसतं. ७) रेकॉर्ड कर तुझ्या बापाला, मारून टाकेन ८) ज्यादिवशी ब्राह्मणाचा शब्द काढशील, ब्राह्मणांना बोलशील ना तर त्यादिवशी परशुरामाचा परशू तुझ्या घुसवील ९) तुला तिथं येऊन मारीन. १०) तुला घरात येऊन मारीन, या वक्तव्याचा व धमकीचा आम्ही जाहीर निषेध करतो, असे या निवेदनात नमूद आहे.
या धमकीवरून देश सध्या जातिवादाकडे, धर्मांधतेकडे व हुकूमशाहीकडे आणि अराजकतेकडे वाटचाल करत आहे. पुढील काळात असेच सुरू राहिले तर संविधान आणि लोकशाही संपायला आणि देशाची वाट लागायला वेळ लागणार नाही. या निवेदनावर शिवाजी राजेजाधव, प्रदीपदादा बिलोरे, महेश पवार, सुधाकर देशमुख, राजेंद्र आढाव, चंद्रकांत साबळे, बाळू मस्के, परमेश्वर किंगर, अविनाश केळकर यांच्यासह नागरिकांच्या सह्या आहेत.