– सिंदखेडराजा व बुलढाणा उपविभागाची संयुक्त कारवाई, पोलिस विभागाचे सहकार्य
– जाफ्राबाद हद्दीत पळून गेलेल्या सहा बोटींवर जाफ्राबादच्या तहसीलदारांचीही कारवाई
– बोटीवर आढळले तीन परप्रांतीय मजूर; देऊळगावराजा पोलिसांत गुन्हे दाखल
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – खडकपूर्णा धरणात बोटींच्या सहाय्याने वाळूतस्करी करणार्या वाळूमाफियांना महसूल विभागाचे दणके सुरूच असून, आजदेखील जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय शोध पथकाच्या साहाय्याने खडकपूर्णा जलशयात सकाळी ९.०० वाजेपासून अवैधरित्या वाळू उपसा करणार्या बोटीची शोधमोहीम सिंदखेडराजा उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, व बुलढामा उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांच्या नियंत्रणामध्ये वैशाली डोंगरजाळ तहसीलदार देऊळगावराजा व संतोष काकडे तहसीलदार चिखली यांच्या पथकाच्या साहाय्याने राबवून तीन बोटी पकडण्यात आल्या. या तीनही बोटी जिलेटीनच्या सहाय्याने स्फोटांनी उडवून पाण्यातच नष्ट करण्यात आल्या आहेत. तसेच, नजीकच्या जाफ्राबाद हद्दीत पळून गेलेल्या सहा बोटींवर जाफ्राबाद (जि. जालना) येथील तहसीलदार सारिका भगत यांनी कारवाई करून वाळूतस्करांना तिकडेही दणका दिला आहे.
खडकपूर्णा जलाशयामध्ये अवैधरित्या वाळूचा उपसा करणार्या बोटी टाकून ज्यांच्या साहाय्याने वाळू उपसतात अशा बोटी नष्ट करण्याची मोहीम राबविण्यात यावी, अशा प्रकारचे निर्देश जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी दिले आहेत. त्यानुसार आज (दि.२२) शोध पथकाने बोट व ड्रोनच्या साहाय्याने धरणाची पाहणी करण्यात आली. त्यामध्ये सीनगाव जहागीर येथे ०१ फायबर बोट, ०१ छोटी इंजीन बोट आढळून आली. तसेच सदर बोटीवर छत्तीसगड राज्यातील तीन मजूर आढळून आले. या वाळूचोरी करणार्यांवर पोलिस स्टेशन देऊळगावराजा येथे ग्राम महसूल अधिकारी सीनगाव जहाँगीर मधुकर उदार यांच्यामार्फत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांची नावे साफीकूल शेख इरफान शेख वय ३२ वर्षे व समुल शेख नजरुल शेख वय ३४ वर्षे रा. पियारपूर ता. राधानगर, जि. साहेबगंज, राज्य छत्तीसगड आणि मीसावा करीम मो आबु बक्कर वय २५ वर्षे रा. बेगमगंज ता. राधानगर, जि. साहेबगंज, राज्य छत्तीसगड अशी आहेत. या मजुरांनी अवैधरित्या उपसा केलेली रेतीसुद्धा सदर बोटीमध्ये आढळून आली. त्यावरून या मजुराच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्या तपासातून वाळूतस्करांची नावे पुढे येणार आहेत. पुढील तपास पोलिस विभाग करीत आहे. या दोन्ही बोटी जिलेटिनच्या साह्याने उडवून त्या नष्ट करण्यात आल्या आहेत. तसेच ड्रोनच्या साह्याने इसरूळ व बायगावच्या मध्यभागी एक बोट आढळून आली. ती बोटसुद्धा जिलेटिनच्या साह्याने उध्वस्त करण्यात आली. अशाप्रकारे तीन बोटींवर कारवाई करण्यात आली, यामध्ये तीन बोटीची किंमत अंदाजे ३० लक्ष रुपये आहे. तसेच, यापूर्वी जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी जिल्हाधिकारी जालना यांना पत्र देऊन खडकपूर्णा जलाशयातील बोटींवर संयुक्तपणे कारवाई करण्याबाबत विनंती केली होती.
आज दिनांक २२ जानेवारीच्या कार्रवाईदरम्यान उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी जाप्रâाबाद तालुक्याच्या तहसीलदार सारिका भगत यांच्याशी संपर्क साधून या भागातून पळून गेलेल्या बोटी जाफराबाद हद्दीrमध्ये आढळून आल्यास, त्यांची अडवणूक करून त्यांच्यावर कारवाई करावी, असे सांगितले. त्यानुसार त्यांनी त्यांच्या भागात गेलेल्या जवळपास सहा बोटीवर कारवाई केल्याची माहिती तहसीलदार सारिका भगत यांनी उपविभागीय अधिकारी यांना कळविली आहे. अशाप्रकारे दोन्ही जिल्ह्यांमधून संयुक्त कारवाई करण्यात आली आहे. सदरील कारवाई जिल्हाधिकारी, बुलढाणा किरण पाटील यांच्या निर्देशानुसार, प्रा. संजय खडसे, उपविभागीय अधिकारी, सिंदखेडराजा व शरद पाटील, उपविभागीय अधिकारी, बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली मनिषा कदम, उपविभागीय पोलिस अधिकारी देउळगावराजा, वैशाली डोंगरजाळ, तहसीलदार देउळगावराजा, संतोष काकडे तहसीलदार चिखली, संतोष महल्ले ठाणेदार देउळगावराजा, सायली जाधव, नायब तहसीलदार महसूल देउळगावराजा, पी.पी. घोटकर, नायब तहसीलदार निवडणूक देउळगावराजा, डी बी नरवाडे पीएसआय पोलिस ठाणे देउळगावराजा व पथकातील मंडळ अधिकारी एम. एल. वायडे, विजय हिरवे, अरविंद शेळके, नारायण सोनुने, ग्राम महसूल अधिकारी राजू तागवाले, सुमित जाधव, श्रीमंत पांडव, श्री चव्हाण, श्री कटारे, आकाश खरात, संजय हांडे, मधुकर उदार, अनिल बोंद्रे, किशोर सोळंके, वाहन चालक कैलास चव्हाण, महसूल सेवक सचिन बंगाळे, विठ्ठल हरणे यांच्यामार्फत करण्यात आली. सदरील कारवाईमध्ये शोध व बचाव पथकाचे एएसआय श्री तारासिंग पवार, पोलिस कॉ. पाटील व त्यांची टीम हजर होती. यापुढेही बोटीच्या सहाय्याने अवैध रेती उत्खननचा प्रयत्न झाल्यास जिल्हास्तरीय शोध व बचाव पथकाच्यामार्फत अवैध उत्खननाबाबत वारंवार कारवाई करण्यात येईल. तसेच जे शेतकरी रेतीचे अवैध उत्खननास रस्ता उपलब्ध करून, अवैध रेतीसाठा करण्यास सहाकार्य करतील त्यांच्या ७/१२ वर याबाबतचा बोजा चढविण्यात येईल, याची नोंद घ्यावी. तसेच रेतीचे अवैध उत्खनन व वाहतूक होवू नये, यासाठी गस्ती पथक स्थापन करण्यात आले आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी कळवली आहे.