– उद्या पाकिस्तानात होणार दफनविधी
दुबई – पाकिस्तानचे माजी अध्यक्ष व माजी लष्करप्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ यांचे आज सकाळी दुर्धर आजाराने दुबईमध्ये उपचारादरम्यान निधन झाले मृत्यूसमयी ते ७९ वर्षांचे होते. पाकिस्तानी लष्करानेदेखील आमचे फोर स्टार जनरल आज सकाळी मृत्यूला सामोरे गेल्याचे जाहीर केले. सोमवारी त्यांचा मृतदेह पाकिस्तानात आणला जाणार असून, पाकमध्येच त्यांचा दफनविधी होणार आहे. मुशर्रफ यांच्या निधनाबद्दल पाकिस्तानी लष्कर, पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. मुशर्रफ हे लष्करप्रमुख असताना त्यांनी 1999 मध्ये पाकिस्तानची राज्यघटना रद्द करत, देशात लष्करी राजवट लागू केली होती. त्यानंतर ते जगभरात चर्चेत आले होते. २०१९ मध्ये त्यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा सिद्ध झाल्यानंतर पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली होती. परंतु, ते दुर्धर आजाराने ग्रस्त असल्याचे निदान झाल्यानंतर मार्च २०१६ मध्ये ते वैद्यकीय उपचारासाठी दुबईला गेले होते. मागील आठवड्यात त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले होते. आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
परवेज मुशर्रफ यांचा जन्म ११ ऑगस्ट १९४३ साली दिल्ली येथे झाला होता. १९४७ साली फाळणीदरम्यान त्यांचे कुटुंब दिल्लीहून कराची येथे स्थायिक झाले होते. १९७४ साली मुशर्रफ पाकिस्तानी सैन्यात रुजू झाले होते. त्यांनी २००१ ते २००८ या काळात त्यांनी राष्ट्रपती म्हणून काम पाहिले होते. मुशर्रफ यांनी लष्कराप्रमुख असताना बंड करुन पाकिस्तानची सत्ता ताब्यात घेतली होती. मुशर्रफ यांनी संविधान भंग करुन ३ नोव्हेंबर २००७ साली देशात आणीबाणी जाहीर केली होती. याप्रकरणी त्यांच्यावर डिसेंबर २०१३मध्ये देद्रोहाचा गुन्हा दाखल झाला होता. मुशर्रफ यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच माजी राष्ट्राध्यक्षांना अशी शिक्षा सुनावण्यात आली होती. पेशावरच्या उच्च न्यायालयाने ही शिक्षा सुनावली होती. मात्र, नंतर ही शिक्षा लाहोरच्या उच्च न्यायालयाने रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. विशेष न्यायालयाने दिलेला निर्णय असंवैधानिक असल्याचं लाहोर उच्च न्यायालयाने म्हटलं आहे.
कारगिल युद्धाच्या वेळी जनरल परवेझ मुशर्रफ पाकिस्तानचे लष्करप्रमुख होते. कारगिलबाबत त्यांनी तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांना कोणतीही माहिती दिली नव्हती आणि युद्धाची सुरुवात केली होती. नवाझ शरीफ श्रीलंकेत असताना 12 ऑक्टोबर 1999 मध्ये मुशर्रफ यांनी लष्करी उठाव केला. नंतर त्यांनी स्वतःला पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष घोषित केले होते. त्याआधी श्रीलंकेतून येणाऱ्या मुशर्रफ यांच्या विमानाचे अपहरण करून दहशतवाद पसरवल्याचा आरोप केल्यानंतर नवाज शरीफ यांना अटक करण्यात आली होती. दुसरीकडे, नवाझ शरीफ यांनी 1997 च्या सार्वत्रिक निवडणुकीत विजय मिळवत पंतप्रधानपदाची सूत्रे हातात घेतली होती. त्यावेळी नवाझ शरीफ यांनी जनरल परवेझ मुशर्रफ यांना लष्करप्रमुख केले होते. मात्र त्यांनीच स्वतःला राष्ट्राध्यक्ष घोषित करुन टाकले होते.