वर्धा (प्रकाश कथले) – एका विद्यालयात इयत्ता सहावीमध्ये शिकणार्या पळसगाव (बाई) येथील मुलाने गृहपाठ न केल्यामुळे स्वतःचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाला होता, अशी थाप मारली. प्रकरण पोलिसांकडे गेल्यानंतर खरे रहस्य उघड झाले आणि त्यानेच अपहरण करण्याचा बनाव तयार केल्याचे त्याने पोलिसांसमोर मान्य केले. याउलट समाजमाध्यमावर शालेय विद्यार्थ्यांचे अपहरणाचा प्रयत्न झाला, अशी बातमी व्हायरल झाली. ठाणेदार चंद्रशेखर चकाटे यांनी विद्यार्थ्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता मी गृहपाठ केला नाही.. त्यामुळे शिक्षक मला मारतील, पालकही सोडणार नाहीत म्हणून हा बनाव रचल्याचे त्या विद्यार्थ्याने पोलिसांसमोर मान्य केले.
दररोज क्राईम पेट्रोलसारख्या टीव्ही सिरीयल बघून हुशार झालेल्या त्या मुलाने आपला बचाव करण्यासाठी गावातून शाळेकडे येत असतांना सायकलची चैन पडली. सायकल दुरुस्त करत असल्याच्या प्रयत्नात असतांनाच समोरून एक पांढरी कार आली व थांबली व कारमधून आलेल्या दोन माणसांनी माझे तोंड दाबले व कारमध्ये कोबण्याचा प्रयत्न केला. नेमके त्याचवेळी एक मोटरसायकल येतांना बघून ते भामटे पसार झाले, असे पोलिसांना सांगितले.
एवढी बुद्धी तुला कशी आली, असे पोलिसांनी विचारले असतांना मी टीव्हीवर नियमित क्राईम पेट्रोल बघतो अशीही कबुली दिली. हा गंभीर प्रकार घडल्यामुळे व संबंधित शिक्षकाने व्यवस्थापनाला अपहरणाची माहिती दिली. त्यामुळे शाळेचे व्यवस्थापन सजग झाले त्यांनी तातडीने त्याच्या पालकाला बोलावून घेतले होते. सोबत सोशल मीडियावर मॅसेज टाकणार्या सरपंच धीरज लेंडे यांना पोलीस ठाण्यात नेले. येथे मुलाने रचलेली कहाणी सर्वांसमक्ष कथन केली. परंतु, त्या एका मॅसेजमुळे चर्चेला उधाण आले होते. पोलिसांनी अशाप्रकारच्या घटना घडल्यास आम्हाला सूचना करा, सत्यता पडतावून गरज भासल्यास आम्ही गुन्हा नोंदवू. मात्र, एकाएकी व माहितीच्या आधारे समाजमाध्यमावर कोणतीही माहिती टाकू नका, त्यामुळे पोलीस यंत्रणेवर दबाव येतो व समाजात आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते, असे आवाहन केले.