-मुक्ताई संस्थानच्या वतीने संत ज्ञानेश्वर महाराजांना राखी अर्पण; आळंदी, सासवड, त्र्यंबकेश्वर येथे रक्षाबंधनाची परंपरा
आळंदी (अर्जुन मेदनकर) : श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात रक्षाबंधनदिनी मुक्ताई संस्थान, मुक्ताईनगर यांच्या वतीने श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांना मुक्ताईकडून बंधू श्री ज्ञानदेवांना राखी अर्पण करून रक्षाबंधनाचा पारंपरिक सोहळा भक्तिभावाने पार पडला. या वेळी मंदिर परिसरात भाविकांची उपस्थिती होती. मुक्ताई आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या बंधुभावाचे स्मरण करून रक्षाबंधनाचा हा धार्मिक विधी पारंपरिक पद्धतीने करण्यात आला.
यावेळी मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष रवींद्र भैया पाटील, ह.भ.प. रवींद्र महाराज हारणे, संदीप पाटील तसेच श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त रोहिणी पवार, सागर महाराज लाहुडकर, संदीप भुसे, पांडुरंग पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत राखी अर्पण करण्यात आली. यावेळी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी प्रार्थना करून भाविकांनी दर्शन घेतले.
मुक्ताई संस्थान, मुक्ताईनगर यांच्या वतीने अनेक वर्षांपासून रक्षाबंधनदिनी ही धार्मिक परंपरा जपली जात आहे. संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत सोपानकाका या भावंडांना मुक्ताईच्या वतीने राखी अर्पण केली जाते. त्यानुसार श्रीक्षेत्र आळंदी, सासवड आणि त्र्यंबकेश्वर येथे राखी अर्पण करून रक्षाबंधन सण साजरा केला जातो. या परंपरेमुळे वारकरी संप्रदायातील संतपरंपरा आणि भावंडांमधील प्रेम, श्रद्धा व भक्तिभावाचा संदेश पुढे नेला जात असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. रक्षाबंधनाच्या निमित्ताने आळंदीतील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. मुक्ताईकडून माउलींना राखी अर्पण करण्याचा हा सोहळा श्रद्धा आणि भक्तिभावाने पार पडल्याने उपस्थित भाविकांमध्येही उत्साहाचे वातावरण होते. संतपरंपरेतील या अनोख्या बंधुभावाचे दर्शन घडविणारी ही परंपरा भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरली.