-चैतन्य कानिफनाथांच्या संजीवन समाधीचे घेतले दर्शन; वाहतूक कोंडी, अतिक्रमण आणि पार्किंगच्या समस्येवर चर्चा
शेवगाव (बाळासाहेब खेडकर) : मढी, ता. पाथर्डी : तिसऱ्या श्रावण शुक्रवारनिमित्त अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी श्रीक्षेत्र मढी येथे भेट देऊन चैतन्य कानिफनाथांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मढी देवस्थान परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेत देवस्थानचे विश्वस्त, पाथर्डी पोलीस प्रशासन तसेच भाविकांशी संवाद साधला.
मढी येथे दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येत असल्याने भाविकांची सुरक्षितता, वाहतूक व्यवस्था आणि गर्दीचे नियोजन याबाबत पोलीस अधीक्षक सुदर्शन यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. विशेषतः प्रत्येक अमावस्येला निर्माण होणारी वाहतूक कोंडी, वाढते अतिक्रमण आणि पार्किंगची समस्या यावर देवस्थानचे विश्वस्त तसेच पाथर्डी पोलीस प्रशासनाशी सविस्तर चर्चा करण्यात आली. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता संभाव्य गैरसोयी टाळण्यासाठी योग्य नियोजन करण्याच्या दृष्टीनेही यावेळी आढावा घेण्यात आला. यावेळी मढी देवस्थान समितीच्या वतीने पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर देवस्थानचे अध्यक्ष विठ्ठल मरकड, कार्याध्यक्ष महादेव कोकाटे, कोषाध्यक्ष दादासाहेब मरकड आणि विश्वस्त मदन मरकड यांनी देवस्थानची माहिती तसेच भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या विविध सुविधा आणि सुरक्षा व्यवस्थेबाबत माहिती दिली. यावेळी पाथर्डीचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, देवस्थानच्या सचिव माधुरी मरकड, गुप्तवार्ता विभागाचे नागेश वाघ, व्यवस्थापक संजय मरकड यांच्यासह देवस्थानचे पदाधिकारी आणि पोलीस प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
मढी येथे होणारी भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता आगामी काळात वाहतूक सुरळीत ठेवणे, पार्किंगची प्रभावी व्यवस्था करणे तसेच अतिक्रमणावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने आवश्यक उपाययोजना करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. भाविकांना सुरक्षित आणि सुलभ दर्शनाचा अनुभव मिळावा, यासाठी देवस्थान प्रशासन व पोलिसांनी समन्वयाने काम करण्यावर भर देण्यात आला.